Header Ads

 • Breaking News

  जवखेडे खटला : आरोपीच्या वकिलांना हवीय स्टेशन डायरी


  अहमदनगर । DNA Live24 - जवखेडे खालसा (ता. पाथर्डी) येथील बहुचर्चित तिहेरी हत्याकांड खटल्यात आरोपीच्या वकिलांनी पाथर्डी पाेलिस ठाण्याच्या स्टेशन डायरी मिळावी, यासाठी परवानगी मागितली आहे. विशेष सरकारी वकील अॅड. उमेशचंद्र यादव यांनी त्यास विरोध दर्शविला. मात्र, या खटल्याशी संबंधित बाबींच्या स्टेशन डायरीतील नोंदींच्या सत्यप्रती आरोपींच्या वकिलांना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

  प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीकांत कुलकर्णी यांच्यासमोर जवखेडे खटल्याचे कामकाज सुरू आहे. या खटल्यात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अॅड. उमेशचंद्र यादव हे काम पहात आहेत. बुधवारी व गुरुवारी सकाळच्या सत्रामध्ये सहायक तपासी अधिकारी तथा सहायक पोलिस निरीक्षक शरद गोर्डे यांची सरतपासणी घेण्यात आली. बुधवारी दिवसभर त्यांनी विविध ठिकाणी केलेल्या पंचनाम्यांची माहिती दिली.

  तर गुरुवारी सकाळी गावातील दोन ध्वजस्तंभांचे पंचनामे केल्याचे त्यांनी सरतपासणीमध्ये सांगितले. त्याबाबतचे अचूक तपशीलही त्यांनी कथन केले. त्यानंतर उलटतपासणी घेण्यापूर्वी स्टेशन डायरीच्या प्रती मिळण्याची मागणी आरोपीच्या वकिलांनी केली. तसेच या प्रती मिळेपर्यंत कामकाज तहकूब करण्याची विनंती आरोपींच्या वकिलांनी केली. त्यामुळे खटल्याचे कामकाज स्थगित करण्यात आले. आता या खटल्याची  पुढील सुनावणी येत्या १० व ११ एप्रिलला होणार आहे.

  Post Top Ad

  Post Bottom Ad