Header Ads

 • Breaking News

  तांब्याच्या तारा चोरणाऱ्या भंगारविक्रेत्यांची टोळी गजाआड

  साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त,  कोतवाली पोलिसांची कामगिरी

  चोरीच्या मुद्देमालासह कोतवाली पोलिसांची टीम.

  अहमदनगर । DNA Live24 - केडगावातील सोनेवाडी परिसरात महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे इलेक्ट्रिक साहित्य चोरुन त्याची विक्री करणारी भंगारविक्रेत्यांची टोळी कोतवाली पोलिसांनी पकडली आहे. सहायक पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकाने ही कामगिरी केली. टोळीतील तीन आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्या ताब्यातून सुमारे साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

  महाराष्ट्र विद्युत कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुनिल पाटील यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली होती. कंपनीच्या गोदामात घरफोडी करुन चोरट्यांनी सुमारे ३ लाख रुपयांचे सामान चोरले होते. सहायक पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित व पोलिस निरीक्षक सोमनाथ मालकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला.

  पोलिसांनी खबऱ्यांकडून मिळोलल्या माहितीनुसार केडगावातील भंगारविक्रेता खालीद गरीबउल्ला चौधरी (३८, रा. उत्तर प्रदेश, हल्ली, सोनेवाडी रोड, केडगाव), रामू उर्फ रामधने महानु यादव (४०, साधुनगर, स्वरतगड, सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश, हल्ली केडगाव) यांना आधी ताब्यात घेतले. त्यांनी चोरलेला माल चंद्रकांत बाबासाहेब सुसलादे (२७, शास्त्रीनगर, केडगाव) याच्या मालवाहू वाहनातून पुण्यात विकला होता.

  सहायक पोलिस निरीक्षक पाटील यांच्यासह पोलिस कॉन्स्टेबल लक्ष्मण हंडाळ, बबन राठोड, राजेंद्र मुळे, रामनाथ डोळे, अण्णा बर्डे, संतोष गर्जे, श्रीरंग वराट, श्रीकांत नरोडे, गणेश इथापे, चालक लोंढे यांच्या पथकाने तिन्ही आरोपींना अटक केली. आरोपींनी गुन्ह्याची कबुलीही दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली वाहने व चोरलेला मुद्देमाल असा एकूण सुमारे साडेसहा लाखांचा ऐवज जप्त केला आहे.

  आणखी गुन्ह्यांची कबुली - पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये महिंद्रा मॅक्सिमो कंपनीचा टेम्पो (एमएच १६ एई ९४४६) पॅगो (क्र. एमएच १६ बी ३९८६) व मोटारसायकल (क्र. एमएच १२ बीवाय ५६९९), तसेच ३०० किलो वितळवलेले तांबे, २०० किलो वितळवलेले अॅल्युमिनिअम, याचा समावेश आहे. तिन्ही आरोपींना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यांच्याकडून आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता असून कोतवालीचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप पाटील अधिक तपास करीत आहेत.

  Post Top Ad

  Post Bottom Ad