Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

बुधवार, १५ मार्च, २०१७

उद्योगपतींना कर्जमाफी, मग आम्हाला का नाही ?

माजी आमदार शंकरराव गडाख यांचा सवाल 

नेवासे । DNA Live24 - शासनाच्या विविध योजनामुळे शेतकऱ्याला अडचणी येतात. शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे त्याला पुन्हा पुन्हा कर्ज घ्यावे लागते. ही कर्जे माफ करून त्याचा सात बारा कोरा करावा अशी क्रांतीकारी शेतकरी पक्षाची मागणी आहे. भाजपा सरकार उद्योगपतींचे कोट्यवधीची कर्जे माफ करते. पण शेतकऱ्यासाठीचे ६० हजार कोटींचे कर्ज माफ करत नाही. त्यामुळे हे सरकार भांडवलदारांचे सरकार आहे, असा आरोप माजी आमदार शंकरराव गडाख यांनी केला.

क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह हजारो शेतकऱ्यांनी सात बारा कोरा करावा शेतकऱ्यांना कर्जमाफी या मागणीसाठी तहसीलवर मोर्चा काढला. त्यावेळी शंकरराव गडाख बोलत होते. दोन बैलगाड्या भरून शेतकऱ्यांचे सात बारा तहसीलदारांसमोर ओतून शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करावा, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. या मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार प्रदीप पाठक यांनी स्वीकारले.

यावेळी गडाख म्हणाले, जिल्ह्यात सहकारी बँकेचे ४० हजार शेतकऱ्यांकडे ४०८ कोटी रुपये कर्जे थकीत आहे. यांसह राष्ट्रीयकृत बँका, नागरी बँका पतसंस्थांचेही कर्ज आहे. आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यावर टीका करतांना गडाख म्हणाले, जेथे चरायला भेटते तेथेच त्यांनी लक्ष दिले. विकासाचे आकडे सांगताना आत्मा सारख्या योजना त्यांचे कुरण झाले आहे. जिल्ह्यात १४-१५ च्या पिक विम्यामध्ये सर्वात कमी विमा निधी तालुक्याला मिळाला आहे. मागील वेळी आम्ही आमदार असताना जिल्ह्यात सर्वाधिक विमा रक्कम तालुक्याला मिळाली होती.

या मोर्चात नेवासे पंचायत समितीच्या नूतन सभापती सुनीता गडाख, उपसभापती राजनंदिनी मंडलिक, अध्यक्ष कडूबाळ काळे, प्रशांत गडाख, मुळा कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर, भय्यासाहेब देशमुख, अशोक गायकवाड सहभागी झाले होते. 

मग मुरकुटेंनी बँक काढावी - शेतकरी आंदोलनाची हेटाळणी करून, मुळा बँकेवर संस्थावर टीका करण्यापेक्षा आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी एखादी सहकारी बँक काढून दाखवावी. बँक उभी करून सर्व कर्ज स्वबळावर माफ करून दाखवावीत. त्यांनी तसे केल्यास पुढील निवडणुकीत मीच त्यांचा प्रचार करीन, असे आव्हान माजी आमदार शंकरराव गडाख यांनी यावेळी दिले.
 हा मोर्चा श्रेय घेण्यासाठी - राज्य सरकार कर्जमाफी व कर्जमुक्तीच्या दृष्टीने सकारात्मक आहे. याची कुणकुण लागल्यामुळे शेतकरी क्रांतीकारी पक्षाने मोर्चा काढला. माजी आमदार शंकरराव गडाख यांनी मुळा बँक, यश मल्टीस्टेट, स्वामी समर्थ पतसंस्थेमार्फत राज्य सरकारच्या अगोदर शेतकऱ्यांचा सात बारा उतारा कोरा करावा, असे आवाहन भाजपचे नेवासे तालुका आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केले आहे. गडाखांनी राजकीय पोळी भाजण्यासाठीच मोर्चा काढल्याचा आरोप मुरकुटे यांनी नेवासे येथे पत्रकारांशी बोलताना केला. गडाखांचा मोर्चा हा सोंगा-ढोंगाचा असल्याचेही ते म्हणाले.

Post Top Ad

Your Ad Spot

Pages