728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

कोपर्डी खटला - मुख्य आरोपीने तेव्हाच दिली होती गुन्ह्याची कबुली

अहमदनगर । DNA Live24 - कोपर्डी (ता. कर्जत) येथील अत्याचार पीडित मुलीचा गळा आवळून मृत्यू झाला हाेता. तिचे दोन्ही हात खांद्यापासून निखळलेले होते. तिच्या मुलीच्या शरीरावर गंभीर स्वरूपाच्या २५ जखमा होत्या. शिवाय मुख्य आरोपीने त्याच वेळी गुन्ह्याची कबुली दिली होती, तशी नोंद आपण केसपेपरवर घेतली होती, अशी साक्ष पिडीतेचे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी बुधवारी दुपारी न्यायालयात दिली. त्यांच्यासह आणखी दोन पंचाची साक्ष व उलटतपासणी पार पडली.

कोपर्डी खटल्याची सुनावणी नगरच्या कोर्टात जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर सुरू आहे. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अॅड. उज्वल निकम हे काम पहात आहेत. बुधवारी डॉक्टर दयानंद पवार यांची सरतपासणी अॅड. निकम यांनी घेतली. महिला डॉक्टर सुचेता यादव यांच्यासह आपण मुलीचे शवविच्छेदन केले. तिचा गळा हाताने दाबलेला होता. गळ्यावर ६ जखमा होत्या. जखमांचे अचूक वर्णन करीत तिचा मृत्यू २४ तासांच्या आत झालेला होता, असे डॉ. पवार साक्षीत म्हणाले.

आरोपी जितेंद्र उर्फ पप्पु शिंदे याची वैद्यकीय तपासणीही त्यांनीच केलेली होती. शिंदेच्या अंगावर जखमा नव्हत्या. पिडीता प्रतिकार करू न शकल्याने त्याच्या अंगावर जखमा झाल्या नसतील, असे त्यांनी स्पष्ट केले. आरोपीच्या वकिलांनी त्यांची उलटतपासणी घेतली. नंतर आरोपीचे कपडे जप्त करताना हजर असलेल्या पंचांची सरतपासणी झाली. त्यांनी आरोपीच्या कपड्यांने अचूक वर्णन केले. नंतर घटनास्थळ पंचनामा केल्याच्या वेळी उपस्थित पंचाची सरतपासणी झाली.

घटनास्थळावरून लाल रंगाची लेडिज चप्पल व इतर काही वस्तू मिळाल्या होत्या. वैद्यकीय पथकाने या वस्तू जप्त केल्या, असे त्यांनी सांगितले. त्यांची उलटतपासणीही घेण्यात आली. आणखी दोन दिवस या खटल्याचे कामकाज चालणार आहे. दरम्यान, आरोपी भवाळचे वकीलांनी न्यायालयात एक अर्ज दिला. त्यासोबत जोडलेल्या सीडीमध्ये मराठा क्रांती मोर्चाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या मागणीचे निवेदन, कोपर्डीच्या घटनेबद्दल वर्तमानपत्र व वृत्तवाहिन्यांवरील बातम्यांचा समावेश आहे.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: कोपर्डी खटला - मुख्य आरोपीने तेव्हाच दिली होती गुन्ह्याची कबुली Rating: 5 Reviewed By: DNA Live24