728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

कोपर्डी खटला - जिल्हाधिकारी करणार आरोपीकडून दंड वसूल

अहमदनगर । DNA Live24 - साक्षीदारांच्या खर्चापाेटी न्यायालयाने आकारलेली दंडाची रक्कम भरण्यास आरोपी संतोष भवाळच्या वतीने नकार देण्यात आला. तर आरोपीला ही रक्कम माफ करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे स्पष्ट संकेत न्यायालयाने दिले. आरोपीने दंडाची रक्कम भरली नाही, तर महाराष्ट्र महसूल कायद्यास अधीन राहून महसूल विभागाने ती वसूल करावी, असे आदेश न्यायालयाने दिले. त्यामुळे आता महसूल विभाग आरोपीकडून ही दंडाची रक्कम वसूल करणार आहे. तसेच पुण्यातील एका व्यक्तीची साक्ष घेण्याची परवानगी अॅड. उज्वल निकम यांना मिळाली आहे.

काेपर्डी खटल्याची सुनावणी जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर सुरु आहे. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्वल निकम काम पहात आहेत. खटल्याच्या सुनावणीला आरोपी संतोष भवाळचे वकील अॅड. बाळासाहेब खोपडे सलग तीन वेळा गैरहजर होते. त्यामुळे न्यायालयाने साक्षीदारांच्या खर्चापोटी आरोपीला एकूण १९ हजार रुपयांचा दंड भरण्याचे आदेश दिले होते. दुसऱ्याच दिवशी अॅड. खोपडे कोर्टात आले.

अॅड. खोपडे यांनी न्यायालयात अर्ज दिला. संबंधित साक्षीदारांची उलटतपासणी घ्यायची नाही. त्यामुळे आरोपीला आकारलेला दंड माफ करावा, अशी विनंती त्यांनी केली होती. त्यावर पुन्हा युक्तीवाद झाला. अचानक रक्तदाबाचा त्रास झाल्यामुळे सुनावणीला येऊ शकलो नाही, असे अॅड. खोपडे म्हणाले. आरोपीची परिस्थिती चांगली नसल्याने तो दंड भरू शकत नाही, त्यामुळे हा दंड माफ करावा, अशी विनंती त्यांनी केली.

अॅड. निकम यांनी यावर आक्षेप घेतला. आरोपीने स्वखर्चातून अॅड. खोपडे यांची नियुक्ती केली. ते प्रत्येक सुनावणीला पुण्याहून ये-जा करतात. त्यामुळे आरोपीची सांपत्तिक स्थिती चांगली आहे. वेळोवेळी सुचना देवूनही आरोपीचे वकील आले नाही. साक्षीदारांना हेलपाटे मारावे लागले. न्यायालयाचा धाक रहावा, यासाठी आरोपीकडून दंडाची रक्कम वसूल व्हायलाच हवी, असा युक्तीवाद अॅड. निकम यांनी केला.

दोन्ही बाजूंचे म्हणणे एेकून न्यायालयाने आरोपीला भरायला सांगिलेली रक्कम माफ करणार नसल्याचे स्पष्ट केले. तर अारोपीच्या वतीने ही रक्कम भरण्यास नकार मिळाला. त्यामुळे महाराष्ट्र महसूल कायद्यानुसार ही रक्कम महसूल यंत्रणेने आरोपीकडून वसूल करावी, अशी सूचना न्यायालयाने केली. या आदेशाची प्रत प्राप्त होताच महसूल विभाग आरोपीकडून १९ हजार रुपयांची रक्कम वसूल करणार आहे.

अॅड. निकम पुण्यातला साक्षीदार तपासणार - या खटल्यातील एका साक्षीदाराला कोपर्डीतील घटना पुण्यात एका व्यक्तीकडून समजली होती. तसा उल्लेख साक्षीदाराच्या उलटतपासणीत होता. त्यामुळे पुण्यातील व्यक्तीला साक्षीदार म्हणून तपासण्याची परवानगी अॅड. निकम यांनी मागितली होती. आरोपींच्या वकिलांना याला विरोध केला होता. पण, दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून न्यायालयाने या व्यक्तीची साक्ष घेण्यास परवानगी दिली आहे.

आणखी दोन अर्ज - आरोपींनी वापरलेल्या मोबाईलचे रेकॉर्ड पोलिसांनी दोषारोपपत्रात जोडले आहेत. पण, या मोबाईल कंपन्यांच्या विभागीय अधिकाऱ्यांना साक्षीदार केलेले नाही. खटल्याच्या दृष्टीने त्यांची साक्ष गरजेची आहे. त्यासाठी अॅड. उज्वल निकम यांनी अर्जाद्वारे परवानगी मागितली आहे. याशिवाय आरोपींच्या वकिलांनी मागवलेली आरोपीच्या वाहनाची कागदपत्रे न्यायालयात जमा झाली आहेत. ही कागदपत्रे भारतीय पुरावा कायद्यानुसार रेकॉर्डवर घ्यावीत, अशी विनंती अॅड. निकम यांनी दुसऱ्या अर्जाद्वारे केली आहे.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: कोपर्डी खटला - जिल्हाधिकारी करणार आरोपीकडून दंड वसूल Rating: 5 Reviewed By: DNA Live24