Header Ads

 • Breaking News

  स्फोटात कुटुंब गमवलेल्या संतनाला अमेरिकन कुटुंबाची माया

  अहमदनगर । DNA Live24 - अपघातात सर्वस्व गमवलेल्या आणि अपंगत्वाचा सामना करणाऱ्या ८ वर्षांच्या अनाथ मुलीचे भाग्य येत्या शुक्रवारी अमेरिकेतील सक्षम परिवारातील दत्तकविधानाने बदलणार आहे. स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राच्या प्रयत्नांमुळे या मुलीचे नवीन आयुष्य सुरु होणार आहे. तिचे दत्तकविधान ३ मार्चला संध्याकाळी ५ वाजता केडगाव येथील रुपाली जयकुमार मुनोत बालकल्याण संकुल (नवल इस्टेट, संदीप हॉटेलशेजारी, नगर-पुणे रस्ता) येथे होत आहे.

  बिहारमधून रोजगारासाठी नाशिकमध्ये आलेले चौकोनी कुटुंब नाशिकमधील सातपूर भागात मोठ्या इमारतीच्या बांधकामावर रोजंदारीवर काम करत होते. २७ मे २०१४ रोजी फॅब्रिकेशनसाठी वापरल्या जाणाऱ्या गॅसटाकीचा स्फोट होऊन झालेल्या भीषण अपघातात आई-वडील आणि मुलाचा मृत्यू झाला. पाच वर्षांची मुलगी संतना मात्र ८० टक्के भाजूनही जिवंत राहिली. जखमी संतनाला नाशिक बर्न सेंटरच्या डॉ. राहुल शिंदे यांनी वाचवले.

  संतनाला त्यांनी आपल्या रुग्णालयात ३ महिने स्वतःच्या मुलीप्रमाणे विनामूल्य सांभाळले. जवळचे नातेवाईक, विविध बालसेवी संस्थांनी संतनाला स्वीकारण्यास व सांभाळण्यास नकार दिला. भाजल्याच्या जखमा व सुश्रुशेसोबत शस्त्रक्रियेची जबाबदारी घ्यायला कोणीही तयार नव्हते. ही एक दीर्घकालीन व खर्चिक जबाबदारी होती. त्यामुळे संतना डॉ. शिंदे यांच्या रुग्णालयात पडून होती. तिचे पुढे काय करावे, असा प्रश्न डॉ. शिंदे यांना पडला होता

  नगरच्या पेमराज सारडा महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ. राजेंद्र शिंदे यांना त्यांचे बंधू असलेले डॉ. राहुल यांनी संतनाबद्दल सांगितले. त्या माध्यमातून संतना स्नेहांकुर या स्नेहालयाच्या दत्तक विधान केंद्रात पोहोचली. स्नेहांकुरने संतनाचे नातेवाईक शोधले. संतनाला ते सांभाळणार असतील, तर स्नेहालय व स्नेहांकुर तिच्या सर्व वैद्यकीय उपचारांची जबाबदारी घ्यायला तयार असल्याचे त्यांना सांगितले, पण सर्वांनीच नकार दिला. अखेर तिचा कौटुंबिक पुनर्वसनासाठी परित्याग करून घेण्यात आला.

  नंतर प्रख्यात प्लास्टिक सर्जन डॉ. अजित काळे यांनी संतनावर विनाम्ूल्य शस्त्रक्रिया करून तिचे जीवन सुसह्य केले. नियमित फिजिओथेरपी व इतर उपकरणे वापरून तिच्यामध्ये लक्षणीय सुधारणा झाली. स्नेहालयाच्या इंग्रजी शाळेत शिकणारी हुशार मुलगी म्हणून तिने ओळख मिळवली. दरम्यान, तिला पालक मिळवण्यासाठी मागील अडीच वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. अमेरिकेतील जस्मिन डेविडसन या औद्योगिक सल्लागार असलेल्या सहृदय महिलेने संतनाची माहिती घेतली. ितला कुटुंबात सामील करण्यासाठी दत्तकविधानाची प्रक्रिया सुरु केली.

  जस्मिन यांनी आधी ३ वेगवेगळ्या खंडांतील अनाथ २ मुले आणि १ मुलगी दत्तक घेतली आहे. जस्मिन यांनी संतनाला निवडले. तिच्यासाठी त्या हिंदी भाषाही शिकल्या.
  उद्योजक जयकुमार आणि दिनेश, तसेच त्यांचे वडील समाजसेवक जीवनलाल मुनोत ( बेलवंडी) यांच्या परिवाराच्या सहयोगातून केडगाव येथे वंचित-उपेक्षित बालकांसाठी सुसज्ज दत्तक विधान केंद्र उभारण्यात येत आहे. या केंद्रात होणाऱ्या या पहिल्याच दत्तकविधान सोहोळ्यासाठी सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. वंचित बालकांप्रमाणेच अत्याचारग्रस्त महिलांना वैद्यकीय सुविधा आणि पुनर्वसनाच्या संधी येथे दिल्या जातील.
  मागील १४ वर्षांत सुमारे ६०० अनाथ बेवारस आणि अनौरस बालकांना संस्थेने आई, वडील, घर आणि उज्वल भविष्य मिळवून दिले. मागील चार महिन्यांत विशेष गरजयुक्त ६ बालकांचे दत्तक विधानाद्वारे परदेशातील सक्षम कुटुंबात पुनर्वसन करण्यात आले आहे.

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  Post Top Ad

  Post Bottom Ad