Header Ads

 • Breaking News

  विद्यार्थ्यांनी सामाजिक समस्यांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी घ्यावी - बार्नबस


  अहमदनगर । DNA Live24 - व्यवस्थापन अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर चांगली नोकरी व आर्थिक प्रगतीचे ध्येय प्रत्येक विध्यार्थ्याचे असतेच. त्यासाठी संघर्ष करून धैर्याने व ध्येयाने वाटचाल करावी लागतेच. याचबरोबर सामाजिक जाणीवेतून रोजच्या दैनंदिन कामाबरोबरच विध्यार्थ्यांनी स्वतःच्या व सामाजिक समस्यांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी घ्यावी असे आवाहन डॉ. भा. पा. हिवाळे संस्थेचे सचिव डॉ. विशाल बार्नबस यांनी केले.

  संस्थेच्या आयएमएस कॉलेजमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व विविध स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ डॉ. बार्नबस यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आयएमएसचे संचालक डॉ. एम. बी. मेहता, व्यवस्थापन विभागाच्या डॉ. मीरा कुलकर्णी, संगणक विभागाचे डॉ. उदय नगरकर, प्रा. डॉ. विक्रम बार्नबस, ग्रंथपाल स्वाती बार्नबस, प्रा. डी. ए. कुलकर्णी उपस्थित होते.

  यावेळी विशाल बार्नबस म्हणाले कि, स्वतःची इच्छा ओळखून वाटचाल करताना नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे उद्योजक बना. सतत संघर्षाची व स्वतःला आधुनिक काळानुसार नवनवीन ज्ञान व गोष्टी शिकण्याची सवय ठेवा. जनसंपर्क हा धनराशी पेक्षाही महत्वाचा आहे हे सतत लक्षात ठेवा. ज्यांना पारितोषिके मिळाली त्यांनी अधिक मिळविण्याची अपेक्षा ठेवा असे सांगितले.

  प्रास्ताविकात डॉ. एम. बी. मेहता म्हणाले कि, ज्ञानाबरोबरच विध्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी खेळ, सांस्कृतिक स्पर्धा घेतल्या जातात. त्यातील विजेते तसेच शैक्षणिक गुणवंतांचा गुणगौरव सत्कार करून इतरांना प्रेरणा मिळावी यासाठी वार्षिक स्नेहसंमेलन अत्यंत महत्वाचे ठरते. सर्व सहभागी विध्यार्थी व विजेत्यांचे यानिमित्त त्यांनी अभिनंदन केले.

  मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धेतील विजेत्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्रे देण्यात आली. सांघिक करंडक एमसीए द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी पटकाविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तरुण बजाज याने केले तर आभार साक्षी मध्यानने मानले. यावेळी आयएमएस संस्थेचे प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  Post Top Ad

  Post Bottom Ad