728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

सार्थक गुगळे अपहरण खटल्यात दोघांना जन्मठेप


नेवासे । DNA Live24 - माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र गुगळे (रा. सोनई) यांच्या ९ वर्षीय मुलाचे अपहरण करुन २ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी डांबून ठेवल्याच्या आरोपात दोषी धरत दोघांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. सोनई (ता. नेवासे) परिसरातील कुख्यात गुंड गणेश दत्तात्रय वडघुले (वय २७, रा. वडघुले वस्ती, कांगोणी रोड, सोनई) व बबन नवनाथ लष्करे (वय २३, सोनई) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. एका आरोपीची माफीचा साक्षीदार म्हणून निर्दोष मुक्तता करण्यात आली. नेवासे कोर्टातील जिल्हा सत्र न्यायाधीश सत्यनारायण आर. नावंदर यांनी बुधवारी हा निकाल दिला. या खटल्यात सरकार पक्षातर्फे अॅड. मंगेश वसंतराव दिवाणे यांनी काम पाहिले.

गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात हा प्रकार घडला होता. नेवासे पंचायत समितीचे (त्यावेळचे) सदस्य राजेंद्र गुगळे यांचा ९ वर्षीय मुलगा सार्थक याचे आरोपींनी संगनमताने कट रचून सोनईतून (ता. नेवासे) अपहरण केले. नंतर गुगळे यांच्या मोबाईलवर फोन करुन २ कोटी रुपयांची खंडणी मागितली. मात्र सोनई व एलसीबीच्या पोलिसांनी वेगाने तपासाची सूत्रे फिरवत अवघ्या ८ तासांतच सार्थकची सुखरुप सुटका केली होती. कुख्यात गुंड गणेश वडघुले हाच या अपहरण नाट्याचा मुख्य सूत्रधार होता. त्याने बबन लष्करे व तान्हाजी कुसळकर यांच्या साह्याने या अपहरणाच्या कटाचे नियोजन केले होते.

सार्थक गुगळे
अतिरिक्त पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शशिराज पाटोळे, उपनिरीक्षक संजयकुमार सोने, कर्मचारी मन्सूर सय्यद, सुनिल गायकवाड, रवि सोनटक्के, मल्लिकार्जुन बनकर, दिगंबर कारखिले, विशाल अमृते, शैलेश गोमसाळे, किरण जाधव, रोहित मिसाळ, संतोष गोमसाळे, विनोद मासाळकर, बाळासाहेब भोपळे, देविदास काळे यांच्या पथकांनी, तसेच सोनईचे तत्कालीन सहायक निरीक्षक सचिन सानप, पोलिस नाईक संदीप घोडके, विजय भिंगारदिवे, सोमनाथ झांबरे, सुरेश वैरागर यांच्या पथकाने आरोपींना केली होती.

अॅड. मंगेश वसंतराव दिवाणे
सहायक निरीक्षक सचिन सानप यांनी या गुन्ह्याचा तपास करुन नेवासे कोर्टात चार्जशीट दाखल केले. सरकार पक्षातर्फे या खटल्यात १६ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात ९ वर्षीय सार्थक, त्याचे वडील राजेंद्र गुगळे, सहायक निरीक्षक सचिन सानप यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. सार्थकने निडरपणे आरोपींना ओळखले. तसेच साक्षही नोंदवली होती. सरकार पक्षातर्फे अॅड. दिवाणे, तसेच सहायक सरकारी वकील अॅड. पुष्पा कापसे-गायके, अॅड. मनिषा शिंदे व अनिल सरोदे यांनीही काही साक्षीदारांची सरतपासणी घेतली होती. लहानग्या सार्थकची इन कॅमेरा साक्ष नोंदवण्यात आली होती. अॅड. दिवाणे यांचा प्रबळ युक्तीवाद व खटल्यातील साक्षीपुरावे ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवले.

गुन्हेगारांवर वचक बसेल - आपल्या देशात न्यायव्यवस्था अजूनही जिवंत असल्याचे सिद्ध झाले आहे. या खटल्यात न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे गुन्हेगारांवर वचक निर्माण होण्यास निश्चितच मदत होईल. भविष्यात अशा प्रकारचे गुन्हे घडू नयेत, यासाठी हा निकाल अतिशय महत्वाचा आहे. आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न केले. सरकारी पक्षानेही न्यायालयात प्रबळ बाजू मांडली. म्हणूनच न्याय मिळाला आहे. - राजेंद्र गुगळे, माजी पंचायत समिती सदस्य
आरोपी सराईत - सार्थकचे अपहरण करणारे आरोपी सराईत गुन्हेगार होते. गणेश वडघुले, तान्हाजी कुसळकर व बबन लष्करे यांच्याविरुद्ध सोनई पोलिस ठाण्यात जबरी चोऱ्या, रस्तालूट, चोरी, आर्म अॅक्टसारख्या गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे. या टोळीविरुद्ध नोंद असलेल्या गुन्ह्यांची कुंडलीही पोलिसांनी तयार केली होती. वडघुले यांच्याविरुद्ध नेवासे न्यायालयात आणखीही काही खटले न्यायप्रविष्ट आहेत. 
तान्हाजी माफीचा साक्षीदार - गणेश दत्तात्रय वडघुले व बबन नवनाथ लष्करे यांना न्यायालयाने खंडणीसाठी डांबून ठेवल्याप्रकरणी दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच प्रत्येकी ५० हजार रुपयांचा आर्थिक दंडही ठोठावला. हा दंड न भरल्यास आणखी एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. संगनमताने कट रचल्याप्रकरणी आणखी १० हजार रुपयांचा आर्थिक दंड ठोठावण्यात आला. तर तान्हाजी पांडुरंग कुसळकर (३६, रा. बालाजी मंदिराजवळ, वडार वाडा, सोनई) याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याला माफीचा साक्षीदार करण्यात आले.
मालकावरच उलटला - जन्मठेप झालेला आरोपी बबन लष्करे हा गुन्हा करण्यापूर्वी काही महिने अगोदर माजी पंचायत समिती सदस्य राजू गुगळे यांच्याकडे कामाला होता. त्याला गुगळे यंाच्या आर्थिक सुबत्तेची कल्पना व कौटुंबिक पार्श्वभूमी माहिती होती. त्याच्या माहितीवरुनच वडघुले व कुसळकर यांनी सार्थकच्या अपहरणाचा व खंडणीचा कट रचला. सार्थकला ज्या झोपडीत डांबून ठेवले, तेथे त्याच्यासोबत बबन लष्करेच होता. पण, सार्थकने ओळखू नये, म्हणून हेल्मेट परिधान केेले होते. पोलिसांनी ताब्यात घेतले तेव्हा सार्थकनेच त्याला ओळखले होते.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: सार्थक गुगळे अपहरण खटल्यात दोघांना जन्मठेप Rating: 5 Reviewed By: DNA Live24