अहमदनगर । DNA Live24 - वाहन विक्रीच्या व्यवहारातील पैशांच्या वादातून भिंगारमध्ये झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील फरार महिलेला पोलिसांनी अटक केली. सहायक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण व पथकाने तिला ताब्यात घेतले. माला रमेश कांबळे (रा. भिंगार) असे आरोपी महिलेचे नाव आहे. न्यायालयाने तिला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
सदर बाजारातील (भिंगार) पालखीच्या ओट्याजवळ बुधवारी रात्री दोन गटात वाद झाले. त्यात शेखर देविदास गायकवाड (वय १९, रा. भिंगार) याचा खून झाला होता. याप्रकरणी शेखरच्या भावाच्या फिर्यादीवरुन् पोलिसांनी तिघा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवला. रोहित रमेश कांबळे, शुभम शाम कांबळे व माला रमेश कांबळे (सर्व रा. भिंगार) अशी आरोपींची नावे आहेत. रोहित व शुभम यांना पोलिसांनी तत्काळ अटक केली होती.
दुसऱ्या दिवशी न्यायालयात हजर केल्यानंतर दोघांनाही ६ मार्चपर्यंत पोलिस कोठडी मिळाली हाेती. माला कांबळे हिला दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. या सर्वांच्या पोलिस कोठडीची मुदत सोमवारी संपत आहे. त्यामुळे सोमवारी दुपारी तिघांनाही पुन्हा न्यायालयात हजर केले जाईल. या गुन्ह्याचा अधिक तपास भिंगार कॅम्पचे सहायक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण हे करीत आहेत.