साखरपुड्याला गेले, अन् नवरीच घेऊन आले !


नेवासा । DNA Live24 - समाजात हल्ली मोठ्या थाटामाटात लग्नसमारंभ पार पडतात. पण, नेवासे तालुक्यातील मुळा कारखान्याचे जनसंपर्क अधिकारी यांनी मात्र वेगळाच पायंडा पाडला आहे. शंकरराव बाबुराव दरंदले यांचे चिरंजीव अमोल व सुनिलराव जरे यांची कन्या कविता यांचा लग्नसोहळा साखरपुड्यातच उरकून त्यांनी लग्नाचा अवास्तव खर्च टाळला. इतकेच नाही, तर लग्नाच्या खर्चातून वाचवलेली काही रक्कम बालभवन उपक्रमाला देणगी म्हणून दिली.

अमोल व कविता यांचा साखरपुडा २१ एप्रिलला झापवाडी (ता. नेवासे) येथील शिंदे वस्तीवर होता. पाहुण्यांच्या उपस्थितीत साखरपुडा संपन्न झाला. मात्र ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख साहेब, माजी आमदार शंकरराव गडाख, यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा युवा नेते प्रशांतभाऊ गडाख यांच्या संकल्पनेनुसार 'संकल्प साध्या विवाहाचा' या उपक्रमानुसार शंकरराव दरंदले व सुनील जरे यांच्यासमोर विश्वासराव गडाख यांनी साध्या विवाहाचा संकल्प मांडला.

दरंदले व जरे या दोन्ही परिवारांनी त्याला तात्काळ होकार दिला. लगेचच उपस्थित असलेल्या पाहुण्यांच्या समोरच अमोल व कविता या सुशिक्षित वधुवरांचा विवाह अगदी साध्या पद्धतीने संपन्न झाला. याप्रसंगी शंकरराव दरंदले परिवाराने समाजाप्रती आपल्या जाणिवेतून, तसेच माजी खासदार यशवंतराव गडाख साहेब यांच्या प्रेरणेतून सुरू असलेल्या 'गाव तिथे वाचनालय' या उपक्रमासाठी 5 हजार रूपये देणगी म्हणून दिले. 

तसेच नेवासे तालुका पंचायत समितीच्या सभापती सुनिताताई गडाख यांच्या संकल्पनेनुसार सुरू असलेल्या समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांना सुशिक्षण  मिळण्यासाठी सुरू असलेल्या 'स्माईली बालभवन' या उपक्रमासाठी 1100 रूपये देणगी दिली. आगळ्यावेगळ्या पद्धतीने पार पडलेल्या या साध्या विवाहाचे संपूर्ण नेवासा तालुक्यात कौतुक होत आहे. याप्रसंगी विश्वासराव गडाख, नानासाहेब तुवर, उषाताई गडाख आदींसह पाहुणे मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.