Header Ads

 • Breaking News

  आकडा टाकून वीजचोरी करणाऱ्याला शिक्षेसह दंड

  अहमदनगर । DNA Live24 - आकडा टाकून वीजचोरी केली म्हणून महावितरण कंपनीतर्फे दाखल केलेल्या फौजदारी खटल्यातील आरोपीला न्यायालयाने कोर्ट उठेपर्यंत साधी कैद व १२ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. वसंत विश्वनाथ कासोदे (५३, रा. वाळुंज, ता. नगर) असे आरोपीचे नाव आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी हा निकाल दिला. या खटल्यात महावितरण कंपनीतर्फे अॅड. सुरेश लगड यांनी काम पाहिले. त्यांना अॅड. शारदा लगड यांनी सहकार्य केले.

  वाळुंज येथे वसंत कासोदे याने त्याच्या घरामध्ये आकडा टाकून अनधिकृतरित्या वीजजोड घेतला होता. त्याचा औद्योगिक कारणासाठी वापर सुरु होता. महावितरण कंपनीची वीजचोरी निर्मुलन धाडसत्राच्या ही बाब लक्षात आली. १४ जून २०१३ ला वीजचोरी तपासणीचे काम सुरू असताना महावितरणचे निंबोडी कक्षाचे कनिष्ठ अभियंता सुभाष सोनबा साळुंखे व सहकाऱ्यांनी पंचासह तपासणी केली. त्यावेळी कासोदे याच्या घरात ३ एचपीचा वीजभार औद्योगिक कारणासाठी वापरला जात असल्याचे आढळून आले.

  साळुंखे यांनी विद्युत कायदा कलम १३५ व १३८ अन्वये ११८८ युनिट वीज चोरुन वापरली म्हणून महावितरण कंपनीचे ११ हजार ६३० रुपयांचे नुकसान केल्याचा गुन्हा नोंदवला. महावितरण कंपनीने जिल्हा न्यायालयात याप्रकरणी एकूण ७१ हजार ६३० रुपयांची नुकसान भरपाई मिळावी म्हणून दावा दाखल केला. त्यात आरोपी कासोदे यांनी न्यायालयात हजर होऊन गुन्हा मान्य केला. त्यावर न्यायालयाने त्यांना कोर्ट उठेपर्यंत साधी कैद व दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम महावितरण कंपनीला देण्याचेही आदेशात म्हटले आहे.

  Post Top Ad

  Post Bottom Ad