Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

रविवार, १६ एप्रिल, २०१७

लष्करे टोळीतील सोपान गाडे, प्रविण खरचंद जेरबंद

अहमदनगर । DNA Live24 - नेवाशातील कुख्यात लष्करे टोळीतील सोपान भगवान गाडे व शार्पशुटर प्रविण पोपट खरचंद यांच्या मुसक्या आवळण्यात अहमदनगर पोलिसांना यश आले. अतिरिक्त पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील, सहायक पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने तेलंगाना राज्यात जाऊन ही कामगिरी केली. पोलिसंाचे पथक गेले आठ दिवस कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगाना राज्यात शोधमोहिम राबवत होते. अखेर शुक्रवारी सायंकाळी या टीमला यश आले.

सोपान गाडेला अॅड. असिफ पटेल खुन खटल्यात जन्मठेपेची शिक्षा झाली होती. अॅड. रियाज पठाण यांच्या खुन खटल्यातही तो आरोपी होता. हा खटला न्यायप्रविष्ट असून याच खटल्याच्या कामकाजासाठी येरवडा कारागृहातून आणले असता २१ जुलै २०१५ ला पुणे पोलिसांच्या ताब्यातून तो पसार झाला होता. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद होती. यापूर्वीही त्याच्यावर  दंगल, मारहाण, जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचेही गुन्हे दाखल आहेत.

अॅड. पठाण यांच्यावर गोळीबार करणारा शार्पशुटर प्रविण पोपट खरचंद आजारी असल्याने त्याला १ एप्रिलला उपचारांकरिता जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. तेथून २ एप्रिलच्या पहाटे तो लघुशंकेचा बहाणा करुन पळाला. प्रविणला पळून जाण्यासाठी प्रफुल्ल उर्फ सोनू आण्णासाहेब पराड (रा. नवनागापूर) याने मदत केली. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे. हे आरोपी पळून गेल्यामुळे त्यांच्याकडून गंभीर स्वरुपाचा मोठा गुन्हा होण्याची शक्यता होती.

त्यामुळे पोलिस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेचे एक विशेष पथक आरोपींच्या शोधासाठी तैनात केले. या पथकात सहायक पोलिस निरीक्षक संदीप पाटील, शरद गोर्डे, पोलिस हेड काॅन्स्टेबल योगेश गोसावी, उमेश खेडकर, पोलिस नाईक दत्तात्रय हिंगडे, राहुल हुसळे, रविकिरण सोनटक्के, योगेश सातपुते, चालक बाळासाहेब भाेपळे, सचिन कोळेकर यांचा समावेश होता.

पोलिसांना सोपान गाडे हैदराबाद परिसरात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिस पथक त्यादिशेने रवाना झाले. पथकाने तेलंगाना, हैदराबाद (आंध्र प्रदेश), बिदर, मुधोल (कर्नाटक) आदी ठिकाणी जावून संभाव्य निवासाच्या ठिकाणी आरोपींचा शोध घेतला. मात्र, ते सापडले नाही. ११ एप्रिलला हैदराबाद येथे निघणाऱ्या मिरवणुकीत आरोपी येणार असल्याची पक्की खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी वेशांतर करुन सापळा रचला, अन् त्यांना यश आले.

सोपान उतरला व्यवसायात - फरार झालेला सोपान गाडे शंकरपेल्ली (जि. रंगारेड्डी, तेलंगाना) येथे मार्बलचा (फरशी बसवण्याचा) व्यवसाय करत हाेता. नगर पोलिसांनी तेथील स्थानिक पोलिसंाच्या मदतीने सापळा रचून त्याला सिनेस्टाईल पद्धतीने पकडले. कसून चौकशी केली असता त्याने प्रविण खरचंद हा दुसरा साथीदार प्रफुल्ल उर्फ सोनू आण्णासाहेब पराड याच्यासह साई कॉलनीतील घरात भाड्याने रहात असल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार पोलिसांनी प्रविण व सोनूलाही सिनेस्टाईल पाठलाग करुन पकडले.

तुरुंगात झाली ओळख - अॅड. पठाण खून खटल्यात अटकेनंतर प्रविण खरचंद सबजेलमध्ये बरेच दिवस होता. तेथेच त्याची प्रफुल्ल उर्फ सोनू पराड (नवनागापूर) याच्यासोबत ओळख झाली. सोनू काही महिन्यांपूर्वी एका खून प्रकरणात सबजेलमध्ये होता. त्यांची ओळख पुढे घट्ट मैत्रीत रुपांतरीत झाली. नंतर सोनू खटल्यातून दोषमुक्त झाला. बाहेर आल्यावरही तो प्रविणच्या संपर्कात होता. दोघांनी मिळून पळून जाण्याचा कट रचला. सोनूनेच प्रविणला पळून जाण्यासाठी मदत केली होती.

पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न - गाडे व खरचंद यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक तैनात झाले. या पथकाने गेल्या आठ दिवसांत तीन राज्ये पालथी घातली. आरोपींचा निश्चित ठावठिकाणा समजला, तेव्हापासून पथक अहोरात्र जागे होते. आरोपींनी पलायनाचा प्रयत्नही केला. मात्र, जीव धोक्यात घालून पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. आरोपींना नगरला आणण्याचा सलग बारा तासांचा परतीचा प्रवासही धोकादायक होता. पण, विशेष पथकातील जिगरबाज पोलिसांनी कामगिरी फत्तेच केली.

ते जोडपेही गवसले - सोपान गाडे व खरचंद यांना पकडायला गेलेल्या पोलिसांना एकूण तीन गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले. सोपान गाडे व खरचंद तर त्यांना गवसलेच. त्यांच्या पलायनाप्रकरणी कोतवाली व तोफखान्यात स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद होती. याशिवाय तेथे पोलिसांना एक नवविवाहित जोडपेही मिळाले. तरुणाचे नाव अतुल ज्ञानेश्वर कडू (रा. नेवासे) हा एका अल्पवयीन मुलीसह तेथे मिळून आला. याप्रकरणी नेवासे पोलिस ठाण्यात अपहरणाच्या गुन्ह्याची नोंद आहे. पोलिसांनी मुलीची सुटका केली.

Post Top Ad

Your Ad Spot

Pages