Header Ads

 • Breaking News

  जिल्हा चषक स्पर्धेत 110 महिला कुस्तीपटूंचा सहभाग


  अहमदनगर । DNA Live24 - छबु पैलवान क्रीडा नगरी, वाडिया पार्क क्रीडा संकुलमध्ये नगर जिल्हा तालीम संघाच्या वतीने आयोजित जिल्हा चषक कुस्ती स्पर्धेत युवा मल्ल व महिला कुस्ती पटूंच्या डावपेचांचा थरार नगरकरांनी अनुभवला. स्पर्धेत सहभागी झालेल्या 270 मल्ल तर 110 महिला कुस्तीपटूंच्या रोमांचक कुस्तीच्या सामन्याने नगरकरांच्या डोळ्याचे पारणे फेडले.

  रविवारी सकाळी स्पर्धेचे उद्घाटन संभाजी लोंढे यांच्या हस्ते कुस्ती लावून करण्यात आले. प्रारंभी हनुमानच्या प्रतिमेचे पूजन झाले. यावेळी जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे, उपाध्यक्ष रामभाऊ नळकांडे, कार्याध्यक्ष रामभाऊ लोंढे, सहसचिव विलास चव्हाण, नामदेव लंगोटे, नाना डोंगरे, संतोष रोहकले, मोहन हिरणवाळे, हंगेश्‍वर धायगुडे, भाऊसाहेब धावडे आदि उपस्थित होते.

  या स्पर्धेत पुरुषांच्या 35, 42, 48, 57  65 किलो वजन गटात विजयी मल्लांना तीन ते पाच हजार रुपया पर्यंत रोख पारितोषिक दिले जाणार आहे. 74 किलो वजन गटात प्रथम 11 हजार रु., द्वितीय 8 हजार रु. व तृतीय एक हजार रु. तसेच खुल्या गटातील प्रथम विजेत्यास 35 हजार रु. चांदीची गदा, द्वितीय 21 हजार रु. चषक व तृतीय 5 हजार रुपयाचे पारितोषिक दिले जाणार आहे.

  लाल मातीत रंगलेले कुस्तीचे सामने पाहण्यासाठी नगरकरांनी गर्दी केली होती. महिलांच्या विविध वजन गटात विजयी कुस्तीपटूस 3 ते 5 हजार रुपया पर्यंत बक्षिसे ठेवण्यात आली आहे. स्पर्धेचे पंच म्हणून संभाजी निकाळजे, गणेश जाधव, मनोज शिंदे, महिला कुस्ती प्रशिक्षक शबनम शेख काम पाहत आहेत. नगरकरांनी या स्पर्धेला चांगला प्रतिसाद दिला आहे.

  Post Top Ad

  Post Bottom Ad