अहमदनगर । DNA Live24 - आरोपींकडून जप्त केलेले मोबाईल फाेन कोपर्डीचे प्रकरण घडले त्या दिवशी आरोपीच वापरत होते, असे तपासात निष्पन्न झाले, अशी माहिती पीआय शशिराज पाटोळे यांनी उलटतपासणीत दिली. कोपर्डी प्रकरणाचे तपासी अधिकारी तथा स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पीआय पाटोळे यांची साक्ष व उलटतपासणी मंगळवारी पूर्ण झाली.
कोपर्डी खटल्याची सुनावणी जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर सुरू आहे. मंगळवारी सकाळी पोलिस निरीक्षक पाटोळे यांची सरतपासणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी घेतली. पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार २० जुलै २०१६ रोजी आपण तपासाची सूत्रे घेतली, असे पाटोळे म्हणाले. आरोपींचे मोबाईल नंबर घेऊन त्यांचे संभाषणाचे तपशील मिळवण्याची प्रक्रिया केल्याचे त्यांनी सांगितले.
घटनास्थळाचा नकाशा मिळण्यासाठी भूमी अभिलेखशी पत्रव्यवहार केला. आरोपीच्या मोटारसायकलीचे कागदपत्र, तिच्या खरेदीच्या व्यवहाराचे संदर्भ मिळवले. पीआय गवारेंना आरोपींच्या घरझडतीच्या सूचना केल्या. त्यात मिळालेले पुरावे ताब्यात घेतले. पीडितेचे वर्गशिक्षक व इतरांचे जबाब घेतले. हजेरीपुस्तकाचे पुरावे घेतले. तेथून सविस्तर वैद्यकीय अहवाल प्राप्त केले. नंतर डीएनए रिपोर्ट मिळवले.
सर्व पुरावे गोळा करुन तपास पूर्ण होताच न्यायालयात दोषारोपपत्र सादर केल्याचे पाटोळे म्हणाले. न्यायालयात असलेल्या आरोपींनाही त्यांनी ओळखले. आरोपींच्या वतीने अॅड. योहान मकासरे, अॅड. बाळासाहेब खोपडे व प्रकाश आहेर यांनी त्यांची एकूण अडीच तास उलटतपासणी घेतली. पाटोळेंसह या खटल्यात आतापर्यंत ३० साक्षीदारांची तपासणी झाली आहे.
आरोपींचे मोबाईलही जप्त केलेले होते. आपल्याकडे तपास येताच आपण संभाषणाचे तपशील तपासले, असे पाटोळे म्हणाले. तर तपशीलातून काय निष्पन्न झाले अशी विचारणा अॅड. प्रकाश आहेर यांनी केली. त्यावर आरोपींकडून जप्त केलेले मोबाईल घटना घडली त्या दिवशी तेच वापरत होते. त्यांचे एकमेकांशी संभाषणही झालेले होते, अशी माहिती पाटोळे यांनी दिली.
नकाशे वेगळे - तपासी अधिकाऱ्यांनी आरोपींच्या वकिलांना घटनास्थळाच्या नकाशाच्या प्रती दिल्या. मात्र, त्या वेगवेगळ्या असल्याचा आक्षेप अॅड. योहान मकासरे यांनी घेतला. साक्षीदारांना मोठ्या आकाराचा नकाशा दाखवला जात होता, असे त्यांनी निदर्शनास आणले. त्यावर पाटोळे यांनी जाणूनबुजून तसे आकाराचे नकाशे दिल्याचा इन्कार केला. इतर कागदपत्रांवरही मकासरे यांनी आक्षेप नोंदवले.
हो मोर्चे निघाले - कोपर्डीप्रकरणी राज्यभरात मोर्चे निघाले का, मुख्य मागणी काय होती, अशी विचारणा अॅड. खोपडे यांनी उलटतपासणीत केली. त्यावर होय! राज्यभर मोर्चे निघाले होते, आरोपींना फाशी देण्याची मुख्य मागणी होती, असे पाटोळे म्हणाले. वरिष्ठ अधिकारी, सरकारी वकील निकम यांची बैठक घेतली, तपासाच्या कागदांत फेरबदल केले, आरोपीचा संबंध नसूनही निष्कारण गोवले, या आक्षेपाचा मात्र पाटोळे यांनी इन्कार केला.
खोपडेंना सूचना - उलटपासणीत अॅड. खोपडे यांनी पीआय पाटोळे यांनी मोठ्या आवाजात प्रश्न विचारले. त्यावर अॅड. निकम यांनी आक्षेप घेतला. साक्षीदार पोलिस निरीक्षक आहेत. त्यांचा अपमान करु नये, असे निकम यांनी सुनावले. अॅड. खोपडे यांना सुचना देण्याची विनंती त्यांनी न्यायालयाला केली. त्यावर न्यायालयाने खोपडे यांना सूचना केली.