Header Ads

 • Breaking News

  कुख्यात गुंड प्रविण रसाळच्या मुसक्या आवळल्या


  अहमदनगर । DNA Live24 - पुणे जिल्ह्यातील तोरणा किल्ल्याच्या पायथ्याशी तब्बल साडेसहा तासांचा थरारक पाठशिवणीचा खेळ खेळत नगर पोलिसांनी कुख्यात गुंड प्रविण आनंदा रसाळ (३८, रा. निघोज, ता. पारनेर) याच्यासह पाच जणांच्या मुसक्या आवळल्या. रसाळ मोक्कासह निघोजचे माजी सरपंच संदीप वराळ यांच्या खुनाच्या गुन्ह्यात गेल्या चार महिन्यांपासून फरार होता.

  स्थानिक गुन्हे शाखेसह पारनेर पोलिसांनी संयुक्त मोहिम राबवून मंगळवारी मध्यरात्री त्याला जेरबंद केले. पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील, व नगर ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक आनंद भोईटे यांनी बुधवारी सकाळी पत्रकार परिषदेत या कारवाईची माहिती दिली. रसाळ टोळीने जिल्हा परिषद निवडणुकीतील उमेदवारीचे दावेदार, गावातील अतिक्रमणाबद्दल आवाज उठवल्यामुळे कट रचून संदीप वराळ यांचा दिवसा ढवळ्या निघोजमध्ये सिनेस्टाईल खून केला होता.

  वराळ यांच्या हत्येप्रकरणी २१ जणांविरुद्ध पारनेर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे. यातील ५ आरोपी अद्यापही फरार आहेत. हत्येचा कट रचण्यात प्रविण रसाळचा मुख्य सहभाग होता. हत्येपूर्वीच काही दिवस अगोदर तो पॅरोलवर तुरुंगाबाहेर आलेला होता. तर गुन्हा घडल्यापासून तो फरार होता. गेले चार महिने पोलिस त्याच्या मागावर होते. मात्र तो पोलिसांना गवसत नव्हता. प्रविण रसाळ पुणे जिल्ह्यातील वेल्हे गावात असल्याची गाेपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला पकडण्याची मोहिम आखली.

  मंगळवारी दुपारीच पोलिस वेल्हेत दाखल झाले. तेथे नातेवाईकांकडे तो राहिला. तालुक्याचे ठिकाण असलेले वेल्हे डोंगराच्या पायथ्याशी आहे. या डोंगरावरच तोरणा किल्ला आहे. गावात लग्नाची वरात होती. या वरातीत डीजेच्या तालावर प्रविण रसाळ दोस्तांसह बेभान होऊन नाचला. पोलिसही वरातीत सहभागी झाले. मात्र, गर्दीत पकडायला गेले तर गोंधळ उडण्याची शक्यता होती. त्यामुळे पोलिस रसाळच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. वरात साडेतीन तास चालली. स्थानिक पोलिसांनी डीजे बंद केल्यानंतर वरात थांबली. नंतर रसाळ एका घरात मुक्कामी होता.
  रसाळ ज्या घरात मुक्कामी थांबला ते दाट झाडीत होते. घराबाहेर त्याच्या साथीदारांचा पहारा होता. बाहेर कीर्र काळोख, गर्द झाडी, जंगली श्वापदांचा वावर. शिवाय या परिसरात सर्पदंशाचे प्रकार नेहमीच घडतात. त्यामुळे पोलिसही धास्तावलेले होते. मात्र, अशा प्रतिकूल परिस्थितीतही पोलिसांनी जीवाची बाजी लावून, डोळ्यात तेल घालत पहारा देत, याेग्य क्षणाची वाट पहात होते. मध्यरात्री अडीचच्या सुमारास रसाळचे साथीदार पेंगायला लागले, काही जण निघून गेले, अन पोलिसांनी घराकडे कूच केले. सिनेस्टाईल झटापटीनंतर पोलिसांनी सर्वांना जेरबंद केले.

  स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकातील सहायक पोलिस निरीक्षक संदीप पाटील, पोलिस हेड कॉन्स्टेबल योगेश गोसावी, विशाल अमृते, उमेश खेडकर, रविकिरण सोनटक्के, दत्तात्रय हिंगडे, संदीपअाण्णा पवार, भागिनाथ पंचमुख, मच्छिंद्र बर्डे, योगेश सातपुते, बाळासाहेब भोपळे, पारनेर पोलिस ठाण्याचे फौजदार रामेश्वर घुगे, संजय मार्ताेंडकर, पोलिस नाईक अरविंद भिंगारदिवे, महेश आव्हाड यांच्या जिगरबाज टीमने ही कामगिरी फत्त केली. त्याबद्दल पोलिस अधीक्षकांनी त्यांचे कौतुक केले आहे.
  हे आहेत आरोपी - प्रविण आनंदा रसाळ (रसाळवाडी, निघोज), प्रशांत ज्ञानदेव वराळ, डॉ. महेंद्र लक्ष्मण झावरे, अमृता महादू रसाळ, बबन उर्फ किसनराव पाटीलबा कवाद, खंडू विठ्ठल भुकन, राहुल रामदास साबळे (सर्व रा. निघोज), नागेश तुळशीराम लोखंडे (लोणीधामनी, आंबेगाव, पुणे), पिंट्या आनंदा रसाळ, प्रसाद बाबुराव गिरी उर्फ गिऱ्या, विकास आनंदा रसाळ, ज्ञानेश्वर उर्फ माऊली आनंदा रसाळ, प्रशांत उर्फ पशा महादेव बर्डे (बेंबळी, उस्मानाबाद), सचिन धोंडीभाऊ रसाळ, स्वप्निल धोंडीभाऊ रसाळ, ऋषीकेश उर्फ भैय्या सुभाष भोसले, मुक्तार समीर इनामदार, अक्षय झुंबर लुडे, संदीप रेवजी लंके, राजू प्रभु भंडारे.
  यांच्यावर लागणार मोक्का -  प्रविण आनंदा रसाळ याच्यासह प्रशांत महादेव वराळ, राहुल रामदास साबळे, नागेश तुळशीराम लोखंडे, पिंट्या आनंदा रसाळ, विकास आनंदा रसाळ, ज्ञानेश्वर उर्फ माऊली आनंदा रसाळ, प्रशांत उर्फ पशा महादेव बर्डे, ऋषीकेश उर्फ भैय्या सुभाष भोसले, मुक्तार समीर इनामदार व अक्षय झुंबर लुडे यांच्याविरुद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यास न्यायालयाची मंजुरी मिळाली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने त्यांच्याविरुद्ध मोक्काचा प्रस्ताव तयार केला होता. लवकरच त्यांच्याविरुद्ध मोक्का कायद्यानुसार नाशिकच्या न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले जाणार आहे.
  पाच जण फरारच - निघोजचे माजी सरपंच संदीप वराळ यांच्या हत्येप्रकरणी २१ जणांविरुद्ध खुनासह विविध कलमान्वये गुन्ह्याची नोंद आहे. तीन महिन्यांपूर्वी पोलिसांनी काही आरोपींना अटक केली. त्यानंतर तपास थंडावला होता. या गुन्ह्याचे दोषारोपपत्र २० एप्रिलला नगरच्या सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. तरीही या गुन्ह्यातील प्रशांत वराळ, खंडू भुकन, पिंट्या रसाळ, सचिन रसाळ, स्वप्निल रसाळ हे आरोपी अद्यापही फरारच आहेत. भुकनने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला होता. या आरोपींच्या अटकेसाठी वराळ यांच्या नातेवाईकांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे.
  रसाळची प्रचंड दहशत - कुख्यात गुंड प्रविण रसाळची निघोज परिसरात प्रचंड दहशत आहे. त्याच्याविरुद्ध पारनेर व शिरुर पोलिस ठाण्यात गंभीर स्वरुपाच्या तेरा गुन्ह्यांची नोंद आहे. खुनाच्या दिवशी तो गावाबाहेर असल्याचे म्हटले जाते. पण, तोच या गुन्ह्याचा मास्टरमाईंड आहे. त्याच्या दहशतीमुळे पोलिस असूनही गावात दहशतीचे वातावरण होते. फरार असूनही तो समर्थकांकरवी संदीप वराळ यांच्या कुटुंबियांना धमकावत होता. त्याच्याविषयी गावात कोणीही उघडपणे बोलत नाही. त्याचे नाव घ्यायलाही घाबरतात. पोलिसही ऑफ द रेेकॉर्ड ही वस्तुस्थिती मान्य करतात.
  तेही झाले आरोपी - फरारी प्रविण रसाळला मदत करणारे बाळसाहेब निढाळकर (रा. केडगाव चौफुला, दौंड), प्रकाश मारुती जेधे (रा. वेल्हे, जि. पुणे) व गोपिनाथ पांडुरंग मेहेर (देवगाव, आंबेगाव, पुणे) या तिघांनाही पोलिसांनी आरोपी केले आहे. गुन्हेगाराला मदत केल्याचा ठपका त्यांच्याविरुद्ध ठेवण्यात अाला आहे. यापैकी जेधे हा रसाळचा नातेवाईक असून वेल्ह्याच्या उपसभापतीचा पती आहे. तर गोपिनाथ मेहेर रसाळचा मावसभाऊ आहे. पोलिसांनी कारवाईत त्यांच्याकडून दोन चारचाकी वाहनेही जप्त केली आहेत.

  Post Top Ad

  Post Bottom Ad