728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

एक 'दिलखुलास' अनुभव !

रवा संध्याकाळी मला मुंबईवरून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक ( महाराष्ट्र शासन )  देवेंद्र भुजबळ यांचा फोन आला होता की 'डॉक्टर तुम्ही उद्या मुंबईला येऊ शकाल का? "दिलखुलास" आणि "जय महाराष्ट्र" साठी आपली मुलाखत घ्यायची आहे. 'संतुलित आहाराचे महत्त्व' याविषयी प्रेक्षकांना मार्गदर्शन करा. खरे तर अगदी अचानकच फोन आल्यामुळे मी ही थोडी भांबावले.

मी हो म्हटले खरी, पण अगदीच उद्या पहाटेच निघावे लागेल आणि तयारी तर काहीच नाही म्हणून दडपण आले होते. कारण आतापर्यंत या कार्यालयाच्या कामकाजाबद्दल जास्त माहिती नव्हती. फक्त अहमदनगरचे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी मार्च महिन्यातील महिला दिनानिमित्त स्त्री विषयक "लोकराज्य" या मासिकात माझ्या बद्दलची माहिती असलेला लेख प्रसिद्ध केला होता. एवढीच काय ती ओळख!

दुसऱ्या दिवशी पहाटे ४.३० वाजता मी आणि आमचा ड्रायव्हर सागर कारमधून मुंबईला निघालो. वाटेत लोणावळ्याला नाष्टा केला आणि परत पुढे निघालो. मुंबईमध्ये पोहचताच नेट कनेक्शन बंद पडले. त्यामुळे मंत्रालयापर्यंत पोहचण्याचा रस्ता, उशीर होईल का असे अनेक प्रश्न भेडसावत होते. तेवढयात संध्या गरवारे यांचा फोन आला. त्यांनी मला ऑफीसला येण्याचा पत्ता व्यवस्थित सांगितला.

आम्ही पोहचल्यावर त्या मंत्रालयाच्या प्रमुख गेटवर आमची वाट पहात होत्या.  ड्रायव्हरला गाडी पार्क करायला सांगून गेटवर माझा पास काढून आम्ही माहिती व जनसंपर्क संचालनालयात पोहचलो. मला थोडीशी धाकधुकच वाटत होती. कारण मुंबईचे लोक खूपच प्रॅक्टिकल असतात असे ऐकलेही होते व प्रत्यक्षात काही ठिकाणी अनुभवही घेतला होता.

आत गेल्यावरच एका कर्मचा-याने मला नमस्कार करून माझ्या हातातील बॅग घेतली. त्यानंतर अमृता आनप या सदाबहार, गोंडस मुलीने छानसे स्मितहास्य देऊन मला देवेंद भुजबळ सरांच्या केबिनमध्ये नेलं. सरांनी हसून स्वागत केलं. सरांची केबिन खूप छान होती. विविध रंगीबेरंगी नैसर्गिक रोपे कुंडीमध्ये लावलेली होती. मला तांब्याच्या ग्लासमध्ये पाणी प्यायला दिले व चहा मागवला. पण मी चहा पित नाही, असे त्यांना सांगितलं.

तांब्याच्या भांड्यातील पाणी पिऊन माझ्यासारख्या आयुर्वेदिक डॉक्टरला की जिच्या कणा-कणामध्ये आयुर्वेदबद्दल आस्था आहे. तिला  आनंद होणारच ना !सरांशी आजच्या आहार या विषयावर चर्चा करून मी, संध्या आणि अमृता अर्चना शंभरकर मॅडमच्या केबिनमध्ये गेलो. त्याही खूप गोड हसल्या माझ्याकडे पाहून. तिथेही आम्ही काही प्रश्नांवर चर्चा केली. त्यांनी मला त्यांचे "सोलमेट" हे पुस्तक गिफ्ट दिले.
तेथून आम्ही रेकॉर्डींग रुममध्ये गेलो. तिथे शिबानी जोशी या निवेदिका मॅडमशी ओळख झाली. तेथील ही सर्व स्टाफ विनम्र व फॅमिलिअर होता. मला 'दिलखुलास' या कार्यक्रमाचा मस्त छानसा 'मग' त्या सर्व टिमने देवेंद्र भुजबळ सरांच्या हाताने गिफ्ट दिला. खूप छान वाटत होते. मी  तेथील वातावरणात एकदम मिसळून गेले. कुठलाही ताण, दबाव मला वाटत नव्हता.

रेकॉर्डींग सुरू झाले. पंरतु मी एकदम रिलॅक्स असल्यामुळे मी आणि शिबानी मॅडम जणू काही गप्पाच मारत आहोत. असेच मला वाटत होते. पाच भागांचे रेकॉर्डींग जवळ- जवळ दीड तास झाले, परंतु मला अजिबात थकवा जाणवत नव्हता. शिबानी मॅडमने अगदी ओघवत्या शैलीत मला बोलके केलं. "संतुलीत आहार" या विषयावर तीन भाग तर "स्त्री आरोग्य" या विषयावर दोन भागांचे रेकॉर्डींग झाले.

वेळ कसा संपला, समजलेच नाही. तेथुन आम्ही जेवणाच्या कॅटींनमध्ये गेलो. संध्या आणि अमृता माझ्या सोबतच होत्या. आम्ही जेवण एकत्रित केले. कॅन्टीनमधील ताटातील पोळ्या जाड व व्यवस्थित नसल्याने त्यांनी त्यांच्या डब्यातील पोळ्या मला दिल्या, माझ्याबद्दल असणारी त्यांची आस्था बघून मलाही त्यांच्या बद्दल आपुलकी वाटली. जेवतांना मस्त गप्पा मारल्या.

त्यानंतर आम्ही दूरदर्शनच्या रेकॉर्डींगसाठी वरळीला कारमधून गेलो. आम्ही तिघी एकमेकींशी एवढ्या गप्पा मारत होतो की , आमची ओळख आजच झाली आहे, असे जाणवतच नव्हते. मस्तपैकी त्या दोघी सेल्फीसाठी मला पोज द्यायला सांगत होत्या. मी ही तो प्रत्येक क्षण एन्जॉय करीत होते. माझे मन अगदी तरुण, त्यांच्यातीलच मी एक झाले होते. पहाट पासून प्रवासाचा शीण वगैरे काही जाणवत नव्हता.

नेहमीपेक्षा वेगळे आयुष्य त्या दिवशी मी अनुभवत होते. मला माझे रूग्ण, हॉस्पिटल, मुले, संसार अगदी काहीच आठवत नव्हते, एवढी मी त्यांच्या बरोबर एकरूप होऊन गेले होते. अगदी कॉलेजमध्येच मी शिकत आहे, असे वाटत होते. दर पाच मिनिटाला आमचा 'सेल्फी' चालला होता आणि एक क्षण मनात विचार आला की, खरंच रोजच्या त्याच-त्याच रहाट-गाडग्याप्रमाणे चालणाऱ्या आयुष्यामध्ये सर्वांचे करता-करता आपण जगणेच विसरून जातो. आपल्यालाही त्या जबाबदाऱ्यांची इतकी सवय होते की, आपणही त्या आयुष्याबद्दल कधीच तक्रार करीत नाहीत.

माझे तर रोजचे आयुष्य स्त्रीरोग तज्ञ असल्यामुळे जबाबदारीचेच असते. आज मी अगदी रोजचे रूटीन टाळून मोकळा श्वास घेत होते. खूप छान वाटत होते. तेथे निवेदक हेमंत बर्वे यांची भेट झाली. त्यांच्या स्वतःच्या आहाराबाबतच्या काही शंका होत्या. त्याबद्दल थोडा वेळ आम्ही चर्चा केली. रेकॉडींग रूममध्ये "जय महाराष्ट्र" या कार्यक्रमासाठी "संतुलीत आहार"  या विषयावर प्रेक्षकांना मार्गदर्शन केले. मी माझे 'आहार वेद' हे पुस्तक सुद्धा प्रेक्षकांना दाखविले. हा ही  कार्यक्रम खूप छान झाला.

कार्यक्रम संपल्यानंतर दूरदर्शनचे अनेक अधिकारी व कर्मचारी माझी भेट घेण्यासाठी आले. त्यांना माझा आहाराविषयीचा अभ्यास, आणि वक्तृत्त्व फार भावले.  त्या  सर्वांनी फार कौतुक केले. पुन्हा एकदा आपण या विषयावर एक तासाचा कार्यक्रम आयोजित करू, असे ते सर्वजण म्हणाले. कारण 'आहार' हा विषय खूप सखोल आहे. प्रेक्षकांना या विषयी अजून जाणून घ्यायला आवडेल, असे ते सर्वजण म्हणाले.

या आधीही तीन वेळा 'सखी सह्याद्री' ला माझा कार्यक्रम झाल्यामुळे अनेक जण तिथे मला ओळखत होते. हेमंत बर्वे, शंभरकर मॅडम, संध्या आणि अमृता यांना माझी 'आयुर्वेदिक गर्भसंस्कार', 'आरोग्य सखी' , 'एकटीच या वळणावर', 'आहार वेद' ही सर्व पुस्तके मी भेट दिली व त्यांचा निरोप संध्याकाळी सहा वाजता घेतला. येताना मी त्यांना नगरला येण्याचे आमंत्रण देऊन आले. संध्या म्हणाली, मॅडम पुढच्या वेळी आमच्याकडे जरूर रहायला या. आणि आजही काही अडचण आल्यास नक्की घरी या !

खरचं मैत्रीचे बंध कसे असतात ना? काहींशी अनेक वर्ष एकत्र राहूनही जुळत नाहीत, तर काहींशी विचार आणि स्वभाव जुळला तर क्षणार्धात जुळतात. कालपर्यंत अनोळखी असलेले हे सर्व जण आज त्यांच्या आपुलकीमुळे अगदी जवळचे झाले होते. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे  सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे वागणे आपुलकीचे, स्नेहाचे होते.

एकीकडे आपण म्हणतो, मोठया शहरात सिमेंटची जंगलं जसजशी वाढली तसतशी तिथे माणसांच्या मनामधील माणुसकी कमी होत चालली आहे.  पण आजचा माझा हा अनुभव एकदमच वेगळा होता. अविस्मरणीय असा हा दिवस मनाच्या कोपऱ्यात कायमचे घर करून गेला !
- डॉ. शारदा निर्मळ - महांडुळे (लेखिका डॉक्टर व सामाजिक कार्यकर्त्या आहेत)
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: एक 'दिलखुलास' अनुभव ! Rating: 5 Reviewed By: DNA Live24