728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

कोपर्डी खटल्यात सरकार पक्षाचे साक्षीपुरावे पूर्ण

अहमदनगर । DNA Live24 - कोपर्डी खटल्यात सरकार पक्षाचे सर्व साक्षीपुरावे नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, असे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितले. गेल्या बुधवारी एकतिसाव्या साक्षीदाराची साक्ष नोंदवण्यात आली. पुढील तारखेला तिन्ही आरोपींचे जबाब नोंदवले जातील. त्यानंतर बचाव पक्ष काही जणांच्या साक्षी घेणार आहे. त्यामुळे या खटल्याचे कामकाज अंतिम टप्प्यात आले आहे.

जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर कोपर्डी खटल्याचे कामकाज आहे. विशेष सरकारी वकील निकम यांनी पोलिस नाईक भाऊसाहेब मुरलीधर कुरुंद यांची सरतपासणी घेतली. गुन्ह्यातील तिन्ही आरोपींना अटक करण्याच्या प्रक्रियेत त्यांचा सहभाग होता. आरोपींच्या अटकेच्या प्रक्रियेची त्यांनी तपशीलवार माहिती दिली. मुख्य आरोपी जितेंद्र उर्फ पप्पु शिंदेला १४ जुलैला श्रीगोंदा स्टँडवरुन ताब्यात घेतल्याचे ते म्हणाले.

शिंदेला अटक करताना फौजदार भिंगारे, सहायक फौजदार हजारे, हेड कॉन्स्टेबल जाधव, घोडके सोबत होते. १६ जुलैला पिंपळवाडी येथून आरोपी संतोष भवाळला ताब्यात घेतले. तो नातेवाईकांकडे लपला होता. १७ जुलैला पुण्यातील जहांगीर रुग्णालयासमोर आरोपी नितीन भैलुमेला ताब्यात घेतले. तो भावाला भेटायला पुण्यात गेला होता. त्यावेळीच त्याला ताब्यात घेतल्याचे कुरुंद म्हणाले.

आरोपींतर्फे अॅड. योहान मकासरे, बाळासाहेब खोपडे व प्रकाश आहेर यांनी कुरुंद यांची उलटतपासणी घेतली. ही उलटतपासणी अर्धा तास चालली. मकासरे यांनी जितेंद्र शिंदेला अटक केल्याची नोंद स्टेशन डायरीला केली का, अशी विचारणा केली. त्यावर कुरुंद यांनी नाही, असे उत्तर दिले. आंदोलन सुरू झाल्यामुळे भवाळला अटक केल्याचा आक्षेप अॅड. खोपडे यांनी घेतला. कुरुंद यांनी मात्र त्याचा इन्कार केला. तर आहेर यांनी भैलुमेच्या अटकेच्या प्रक्रियेविषयी प्रश्न विचारले.
आता आरोपींचे जबाब - सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी कोपर्डी खटल्यात एकूण ३१ जणांची सरतपासणी घेतली. पोलिस नाईक कुरुंद हे खटल्यातील अखेरचे साक्षीदार ठरले. आता यानंतर एकही साक्षीदार तपासणार नसल्याचेही निकम यांनी जाहीर केले. त्यामुळे २१, २२ व २३ जूनला होणाऱ्या पुढील सुनावणीला तिन्ही आरोपींचे जबाब नोंदवले जातील. तर बचाव पक्षाचे वकील त्यांच्या वतीने काही साक्षीदारांची यादी न्यायालयात देणार आहेत.
जलद कामकाज - ७ ऑक्टोबर २०१६ रोजी कोपर्डी खटल्याचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर झाले. १८ ऑक्टोबर २०१६ रोजी आरोपींवर दोषनिश्चितीची प्रक्रिया झाली. विषेश सरकारी वकील उज्वल निकम यांनी २० डिसेंबर २०१६ रोजी पहिला साक्षीदार तपासला. तर २४ मे २०१७ पर्यंत या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण ३१ साक्षीदार तपासण्यात आले. अवघ्या पाच महिन्यांमध्ये सरकार पक्षाने त्यांचे सर्व साक्षीपुरावे न्यायालयात सादर केले आहेत. यावरुन खटल्याचे कामकाज जलदगतीने चालल्याचे दिसते.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: कोपर्डी खटल्यात सरकार पक्षाचे साक्षीपुरावे पूर्ण Rating: 5 Reviewed By: DNA Live24