Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

मंगळवार, २३ मे, २०१७

कोपर्डी खटला - दबावामुळे नव्हे, तपासात नाव आल्यामुळेच भैलुमेला अटक

अहमदनगर । DNA Live24 - तपासात नाव निष्पन्न झाल्यामुळेच कोपर्डी खटल्यातील तिसऱ्या क्रमांकाचा आरोपी नितीन गोपीनाथ भैलुमेला अटक केली. कर्जतमध्ये अथवा राज्यभरात मोर्चे निघाले म्हणून दबावापोटी कोणाला अटक केली नाही, असा खुलासा पोलिस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी केला. आपल्या उलटतपासणीत भैलुमेच्या वकिलांच्या आक्षेपांचा त्यांनी सपशेल इन्कार केला. कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिच्या खून केल्याच्या खटल्यात त्यांची उलटपासणी पूर्ण झाली. 

जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर कोपर्डी खटल्याची सुनावणी सुरू आहे. या खटल्यात सरकार पक्षातर्फे अॅड. उज्वल निकम हे काम पहात आहेत. सोमवारी एअरटेल व आयडिया कंपनीच्या दोन नोडल अधिकाऱ्यांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. आरोपींच्या नावावर असलेल्या मोबाईल कॉल्सचे तपशील त्यांनी सांगितले. अत्याचाराची घटना घडली, त्या दोन-तीन दिवसांत तिन्ही आरोपींचे मोबाईल त्याच परिसरात असल्याचे त्यांनी म्हटले.

आरोपींतर्फे अॅड. बाळासाहेब खोपडे, अॅड. प्रकाश आहेर यांनी उलटतपासणी घेतली. नाेडल अधिकाऱ्यांनी दिलेल्या सीडीआर प्रमाणपत्रांमध्ये ज्या संगणकातून प्रमाणपत्र काढले, त्याचा व सिम कार्डचा नंबर नसल्याचे आक्षेप त्यांनी घेतले. आरोपी जितेंद्र शिंदेतर्फे उलटतपासणी घेताना अॅड. सागर तडके यांनीही तांत्रिक आक्षेप घेतले. सिम कार्ड कोणत्या आकाराचे होते, याची माहिती प्रमाणपत्रात नसल्याचे ते म्हणाले.

दुपारच्या सत्रात सुरुवातीचेटपोलिस निरीक्षक शिवाजी गवारे यांची उर्वरित उलटपासणी पूर्ण झाली. अॅड. आहेर यांनी पिडितेच्या नातेवाईकांवर पोलिस ठाण्यात गुन्हे आहेत का, अशी विचारणा केली. त्यावर आपल्या कार्यकाळात काहीही नोंद नसल्याचे गवारे म्हणाले. आरोपी भैलुमेच्या अटकेच्या प्रक्रियेबद्दलही त्यांनी आक्षेप घेतले. पीआय गवारे यांनी मात्र त्यांचे खंडन केले. गेल्या वेळी अनुपस्थित असलेल्या अॅड. खोपडे यांनीही गवारे यांची उलटपासणी घेतली.

पुन्हा दंड - गेल्या वेळी अॅड. बाळासाहेब खोपडे सुनावणीला गैरहजर होते. त्यामुळे आरोपी संतोष भवाळतर्फे अॅड. योहान मकासरे यांनी काम पहावे, असा आदेश न्यायालयाने दिला होता. अॅड. खोपडे यांनी त्यावर अर्ज करुन गवारे यांची उलटतपासणी घेण्याची परवानगी मागितली. अॅड. निकम यांनी आक्षेप घेतला नाही. त्यामुळे खोपडे यांना परवानगी मिळाली. मात्र, न्यायालयाने त्यांना २ हजार रुपयांचा दंड भरण्यास सांगितले. खोपडेंनी दंड भरण्यास नकार दिल्यामुळे ही रक्कम महसूलमार्फत वसूल करावी लागणार आहे.
नवा साक्षीदार - कर्जतचे पोलिस नाईक भाऊसाहेब मुरलीधर कुरुंद यांची साक्ष घेण्याची परवानगी अॅड. उज्वल निकम यांनी मागितली. कुरुंद आरोपींच्या अटकेच्या कारवाईत सहभागी होते. मात्र, साक्षीदारांच्या यादीत त्यांचे नाव नसल्याचा आक्षेप घेत आरोपींच्या वकिलांनी तीव्र विरोध दर्शविला. दोन्ही बाजूंचे म्हणणे एेकून न्यायालयाने सरकार पक्षाला पोलिस नाईक कुरुंद यांची साक्ष घेण्याची परवानगी दिली आहे. मंगळवार व बुधवार, असे सलग दोन दिवस या खटल्याचे कामकाज चालणार आहे.
आक्षेपांचे खंडन - आरोपी नितीन भैलुमे हा पुण्यात राहत होता. कोपर्डी घटनेनंतर राज्यभरात मोर्चे निघाले. या मोर्चांमुळे, तसेच राजकीय दबावामुळे पोलिसांनी त्याला अटक केली, असा आक्षेप त्याचे वकील अॅड. प्रकाश आहेर यांनी उलटतपासणीत घेतला. पोलिस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी मात्र सपशेल इन्कार केला. तपासात नाव निष्पन्न झाल्यामुळेच भैलुमेला अटक केल्याचे ते म्हणाले. त्याच्याविरुद्ध भक्कम साक्षीपुरावे असल्याचेही त्यांनी नमूद केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Top Ad

Your Ad Spot

Pages