728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

कामगार कायद्यामुळे कामगारवर्गाचे जीवनमान सुधारले


अहमदनगर । DNA Live24 - कामगार कायद्याने कामगार वर्गाचे जीवनमान सुधारले आहे. पुर्वी कामगार व भांडवलदार संघर्ष तीव्र होता. सध्या कायद्याने कामगारांना त्यांचे हक्क मिळू लागले असल्याची भावना कामगार न्यायालयाचे न्यायधीश एस. एम. साळवे यांनी व्यक्त केली. औद्योगिक, कामगार न्यायालय, एल. एल. पी. ए. व कामगार संघटनांच्या वतीने सावेडी येथील कामगार न्यायालयात आयोजित कामगार दिनाच्या कार्यक्रमात न्यायाधीश साळवे बोलत होते.

प्रमुख पाहुणे म्हणून अ‍ॅड. अशोक पाटील, कामगार नेते कॉ. आनंद वायकर, अनंत लोखंडे, अ‍ॅड. सुधीर टोकेकर, अ‍ॅड. दिपक चंगेडे, बाळासाहेब सुरडे, अ‍ॅड. गोकुळ बिडवे आदि व्यासपिठावर उपस्थित होते. प्रास्ताविकात गजानन देशमुख यांनी कामगार दिनाची भुमिका मांडली. अ‍ॅड. टोकेकर म्हणाले, कामाच्या 8 तासच्या मागणीवरुन अमेरिकेतील शिकागो येथे 1 मे 1886 रोजी कामगारांनी रक्तरंजीत क्रांती घडवली. त्याच्या प्रित्यर्थ जगभरात कामगार दिन 1 मे रोजी साजरा केला जातो.

कामगारांनी आपले हक्क संघर्ष करुनच मिळवले. अनेक कामगार हिताचे कायदे संघर्षातूनच निर्माण झाले. कामगार विरोधी धोरणाने ही चळवळ दडपण्याचा प्रयत्न चालू असून, कामगारांचा संघर्ष अजून तीव्र होणार आहे. या लढ्यात लालबावटा अग्रभागी असणार असल्याचे त्यांनी सांगितले. लोखंडे यांनी कामगार कायद्यात बदल होवून, कंत्राटी कामगार पध्दतीने कामगारांचे शोषण चालू असल्याचे त्यांनी सांगितले.

अ‍ॅड. अशोक पाटील म्हणाले, कामगारांनी वैचारिक पध्दतीने मालकाशी संबंध जोपासले पाहिजे. दोन्ही एकमेकाच्या जीवनाचे अविभाज्य घटक असून, सुख-दु:खात दोन्ही बरोबरीने असत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कॉ. आनंद वायकर यांनी 1886 रोजी अमेरिका येथील शिकागोमध्ये कामगार दिनी झालेल्या क्रांतीवर उजाळा टाकला व 1923 पासून भारतात पहिला कामगार दिन साजरा झाल्याचे सांगितले. ते म्हणाले की, नवीन आर्थिक धोरणाचे दुष्परिणाम कामगारांवर होत आहेत.

कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न उपस्थित झाला असून, भांडवलदार विरुध्द कामगार हा संघर्ष पुन्हा पेटण्याची चाहूल असल्याचे ते म्हणाले. अ‍ॅड. बिडवे यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचलन गजानन देशमुख यांनी केले. आभार देवेंद्र असनीकर यांनी मानले. यावेळी न्यायालयाचे कर्मचारी रंगनाथ गवळी, अवतार मेहेरबाबा पी. पी. सी. ट्रस्टचे अध्यक्ष सतीश पवार, विजय भोसले, किशोर कांबळे, प्रविण भिंगारदिवे, अनिल ससे, बँक कर्मचारी संघटनेचे अप्पासाहेब गोपाळघरे आदिंसह कामगार उपस्थित होते.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: कामगार कायद्यामुळे कामगारवर्गाचे जीवनमान सुधारले Rating: 5 Reviewed By: DNA Live24