Header Ads

 • Breaking News

  करजगाव ग्रामस्थांनी रोडचे काम पाडले बंद

  नेवासे । DNA Live24 - तालुक्यातील करजगाव ते विठ्ठलवाडी दरम्यान तब्बल चार वर्षे रखडलेल्या रस्त्याचे काम चुकीच्या पद्धतीने व निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करीत संविधान नायक महापुरुष सन्मान समितीच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडले. तसेच याप्रकरणी उपविभागीय अभियंत्यांना घेराव घालून जाब विचारला.

  शनिशिंगणापूर ते शिर्डीला जोडणारा रस्त्याच्या कामापैकी करजगाव पर्यंतचे काम यापूर्वीच पूर्ण झाले होते. मात्र करजगाव ते शनिशिंगणापूर पर्यंतचे रस्त्याचे काम चार वर्षांहूनही अधिक काळ रखडले होते. याबाबत नागरिकांनी वारंवार पाठपुरावा केल्यानंतर हे काम काही दिवसांपूर्वी सुरू झाल्याने परिसरात समाधानाचे वातावरण होते. मात्र संबंधित ठेकेदारांनी रस्ते मजबूतीकरणाबरोबरच डांबरीकरणाचे सर्व शासकीय नियम डावलून रस्ता रूंदीकरणादरम्यान केली जाणारी खोदाई पुरेशी खोल केली नाही.

  तसेच या खोदाईत मुरूम टाकून पिचिंग करण्याऐवजी खोदाई दरम्यान निघालेली काळी माती दाबली जात असल्याकडे ग्रामस्थांनी लक्ष वेधले. परिसरात सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या संविधान नायक महापुरुष  सन्मान समितीच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नेवासा येथील उपविभागीय निवेदनाद्वारे लक्ष वेधून आंदोलनाचा इशारा दिला.

  मात्र या कार्यकर्त्यांनी निवेदन दिल्यानंतर अवघ्या काही तासातच संबंधित अधिकाऱ्यांनी लेखी पत्र देऊन हे काम नियमाप्रमाणे तसेच उत्तम दर्जाचे असल्याने चुकीचे आरोप करून आंदोलन करू नये, असे समजावले. परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी तक्रारीची कोणतीही शहानिशा न करता किंवा कामाच्या ठिकाणी येऊन प्रत्यक्ष पाहणी न करता उत्तर देण्याची दाखविलेली तत्परता संदिग्ध वाटली.

  त्यामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र दिनी या रस्त्याचे काम बंद पाडल्याचा दावा केला आहे. त्यानंतर या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकामाचे नेवासा उपविभागीय अभियंता व्ही. एस. नरसाळे यांना घेराव घालून जाब विचारला. कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन अखेर नरसाळे यांनी 5 मे रोजी पाहणी करण्याचे लेखी स्वरूपात मान्य केले. नंतर आंदोलकांनी आपले आंदोलन मागे घेतले.

  Post Top Ad

  Post Bottom Ad