Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

शुक्रवार, ३० जून, २०१७

चुका होणे स्वाभाविक, पण पुनरावृत्ती हे पापच !


अहमदनगर । DNA Live24 - अविचारामुळे मोलाचा मानवजन्म वाया घालवणे हे अतिशय खेदजनक आहे. चुका होणे हे स्वाभाविकच आहे. मात्र, चुकांची पुनरावृत्ती करणे हे मात्र पाप आहे. सुधारणा पुनर्वसनाची संधी न्यायव्यवस्था कारागृह विभाग बंदीबांधवांना उपलब्ध करून देतो. या संधीचा लाभ घेऊन सदाचार, सन्मार्गाची कास धरा. परिवर्तनाचा संकल्प करा, कारागृह साधनेची जागा बनू दे, असे आवाहन महेश महाराज देशपांडे यांनी केले.

आषाढी वारीनिमित्त जिल्हा कारागृहात कारागृह अधीक्षक नागनाथ सावंत, वरिष्ठ जेलर श्यामकांत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदीजनांसाठी महेश महाराज देशपांडे यांचे हरिकीर्तन झाले. यावेळी सावंत, शेडगे, कारागृहातील शिपाई, डॉक्टर, नगर प्रेस शहर क्लबचे अध्यक्ष मन्सूर शेख, राजू ढोरे, राजाभाऊ महाराज म्हेत्रे, विष्णुपंत म्हेत्रे आदींसह कारागृहातील कर्मचारी बंदीजन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संत तुकाराम महाराज यांच्या ‘आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुध्द करा हित ते करावे देवाचे चिंतन करोनिया मन एकविध॥ तुका म्हणे हित होय तो व्यापार करा काय फार शिकवावे ॥’ या अभंगावर महेश महाराज यांनी निरुपण केले. ते म्हणाले, घडलेल्या चुकांविषयी पश्चाताप मानला, तर परिवर्तन होणे शक्य आहे. विचारांनी आचार सुधारतो. त्यामुळे निरर्थक विचार करण्यापेक्षा सार्थ विचार करा. 

चुकांचे प्रायचित्त व्यक्त केल्यास कारागृह परिवर्तनाची जागा बनेल. न्याय व्यवस्थेने सुनावलेली सजा सुधारणेची संधी समजा. संत विचारांचा अंगीकार कराल, तर कारागृह परिवर्तनाची पंढरी ठरेल. वाममार्गाचे “वार”करी होण्यापेक्षा संत विचारांचे वारकरी व्हा, असे त्यांनी सांगितले. कारागृह अधीक्षक सावंत यांनी प्रास्ताविक केले, वरिष्ठ जेलर शामकांत शेडगे यांनी आभार मानले.

जामखेड येथील दिवंगत ग. स. तथा बाळासाहेब देशपांडे राशीन येथील श्रीधर पुंडे गुरुजी यांच्या प्रेरणेतून अॅड. अरुण महाराज पुंडे पत्रकार महेश महाराज देशपांडे हे दोघे मागील चार वर्षांपासून विविध कारागृहांतील बंदीजनांच्या वैचारिक परिवर्तनासाठी निःशुल्क जागर उपक्रम हरिकीर्तनाच्या माध्यमातून राबवत आहेत.

गुन्हेगारीच्या वाटेस लागलेली पावले संत विचाराने परिवर्तनाच्या दिशेने वळवत बंदीजन भविष्यात देशाचा सुजाण नागरिक व्हावा, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन कारागृह विभागच्या ‘सुधारणा आणि पुनर्वसन’ या ब्रीदवाक्यास अनुसरून केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा कारागृहातील बंदीजनांसाठी महेश महाराज देशपांडे यांचे हरिकीर्तन झाले.

हरिकीर्तनात बंदी तल्लीन - महेश महाराज देशपांडे यांनी सुमारे दोन तास संत ज्ञानेश्वर, तुकाराम, सावता महाराज, गुरुगोविंदसिंह, मोहंमद पैगंबर, संत कबीर यांच्या अभंगांवर कीर्तन केले. व्यवहारातील दाखले देत विठूनामाचा गजर आणि संतविचारांचा जागर केला. टाळ-मृदंगाच्या निनादात टाळी वाजवत हरिनामाच्या गजरात कारागृहातील बंदीजन तल्लीन झाले होते. निवृत्तीबाबा चोपदार, धनंजय एकबोटे, केदार देशपांडे, भैरवनाथ जाधव, सुजित गायकवाड, कृष्णा फाळके, संदीप जगदाळे यांनी साथसंगत केली.

Post Top Ad

Your Ad Spot

Pages