तब्बल ३० वर्षांनंतर 'त्याला' मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन केला होता खून
 
अहमदनगर । DNA Live24 - तब्बल तीस वर्षांपूर्वी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिचा खून केल्याच्या गुन्ह्यात एका आरोपीला जिल्हा न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. सिताराम बाबूराव जगताप उर्फ भाऊसाहेब साळवे (६४, रा. कनोली, संगमनेर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी बुधवारी दुपारी हा निकाल दिला. या खटल्यात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड. अर्जुन पवार यांनी काम पाहिले.

या खटल्याची पार्श्वभूमी अशी आहे की, सिताराम उर्फ भाऊसाहेब हा १९८७ मध्ये कोल्हार खुर्द (ता. राहुरी) येथे शेतमजूर म्हणून कामाला होता. जानेवारी १९८८ मध्ये त्याने सायंकाळच्या सुमारास शेतमालकाच्या मुलीवरच बलात्कार करुन तिचा खून केला. तिचे प्रेत जवळच्या शेतात टाकून पसार झाला. मुलीच्या पालकांनी राहुरी पोलिसांत मुलगी हरवल्याची तक्रार दिली. दुसऱ्या दिवशी सिताराम साकुर (ता. संगमनेर) येथे सापडला. त्याने मुलीवर अत्याचार करुन तिचा खून केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला. तेथे सितारामची सायकल व शर्टाची बटणे मिळाली. सायकलच्या हँडलवर सितारामचे नाव होते. पोलिसांनी तपास करुन न्यायालयात चार्जशीट पाठवले. मात्र, सितारामने एक वर्षापूर्वी लोणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतही एक बलात्काराचा गुन्हा केला होता. त्यामुळे लोणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध खटला चालवला. त्या खटल्याचा आठ महिन्यातच, म्हणजे ऑगस्ट १९८८ मध्ये लागला. त्यात सितारामला ७ वर्षे सक्तमजुरी व ५०० रुपये दंडाची शिक्षा झाली.

ही शिक्षा पूर्ण भोगून सिताराम तुरुंगाबाहेर आला. त्यावेळी राहुरी पोलिसांनी सितारामला त्यांच्याकडील खून व बलात्काराच्या गुन्ह्यात वर्ग करुन प्रलंबित खटला चालवणे अपेक्षित होते. पण, तत्कालीन पोलिस अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्यामुळे सिताराम फरार झाला. त्यानंतर तब्बल सोळा वर्षांनी (सन २०१६ मध्ये) त्याला अटक झाली. नंतर राहुरीच्या गुन्ह्याचा खटला नगरच्या जिल्हा सत्र न्यायालयात वर्ग झाला. जिल्हा सत्र न्यायाधीश केवले यांनी या खटल्याची जलदगतीने सुनावणी घेतली.

अॅड. अर्जुन पवार यांनी सरकार पक्षातर्फे एकूण १० साक्षीदार तपासले. मुलीचे चुलते, पंच, आरोपी सिताराम व मृत मुलगी यांना घटनेपूर्वी सोबत पाहणारे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांच्या साक्षी व पुरावे या खटल्यात महत्वाचे ठरले. त्यानुसार सितारामला दोषी ठरवून न्यायालयाने बलात्कार व खुनाच्या गुन्ह्यात मरेपर्यंत जन्मठेपेची व एकूण २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. खटल्याच्या कामकाजात राहुरीचे पोलिस एम. डी. राजपूत व पैरवी अधिकारी पी. टी. हुशारे यांनीही सरकार पक्षाला सहाय्य केले.

खटल्यास प्राधान्यक्रम - फरार असलेल्या बलात्कार व खुनाच्या गुन्ह्यात तब्बल सोळा वर्षांनंतर (सन २०१६ मध्ये) आरोपी सितारामला अटक झाली. त्यानंतर नगरच्या सत्र न्यायालयात या खटल्याचे कामकाज सुरू झाले. सत्र न्यायालयाने ही केस जुनी असल्याचे निरीक्षण नोंदवले. तसेच विशेष खटला म्हणून या केसला प्राधान्यक्रम देत जलदगतीने या खटल्याची सुनावणी घेतली. नगरच्या जिल्हा सत्र न्यायालयात या खटल्याचे कामकाज अवघ्या एका वर्षाच्या आत पूर्ण होऊन बुधवारी निकालही लागला.