Header Ads

 • Breaking News

  गरिबीचा न्यूनगंड झटकून यशासाठी प्रयत्नशील रहावे - बेल्हेकर


  जामखेड  । DNA Live24 - शिक्षणातून आयुष्यात परिवर्तन होते. मोठे यश मिळवायचे असेल तर आर्थिक दुर्बलता ही कधीच अडसर नसते. त्यामुळे गरिबीचा न्यूनगंड बाजूला फेकुन देत यशासाठी सतत प्रयत्नशील रहा, असे प्रतिपादन जामखेडचे तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांनी केले. प्रयोगवन परिवार व समाजबंध यांच्या संयुक्त विद्यमाने जामखेड तहसिल कार्यालयात आयोजित शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

  या कार्यक्रमाला तालुका गटशिक्षणाधिकारी पोपट काळे, समाजबंधचे अध्यक्ष सचिन आशासुभाष, हर्षल लोहकरे, जामखेड रोटरी क्लबचे अध्यक्ष महादेव डुचे, प्रयोगवनचे अध्यक्ष सत्तार शेख, केंद्रप्रमुख लक्ष्मीकांत देशमुख, केंद्रप्रमुख निळकंठ घायतडक, बाजार समितीचे संचालक सोमनाथ सातव, शिक्षक प्रविण शिंदे, अविनाश बोधले, संजय वारभोग, शिवाजी इकडे, हनुमंत काळे, कासम शेख आदी उपस्थित होते.

  तहसिलदार बेल्हेकर म्हणाले, प्रयोगवन परिवाराने उपेक्षित घटकातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सुरू केलेली मोहिम कौतुकास्पद आहे. उपेक्षित घटकातील मुले शैक्षणिक साहित्याअभावी शिक्षणापासून वंचित राहु नये यासाठी या संस्था उपेक्षितांच्या पाठीशी तळमळीने उभ्या राहत आहेत. प्रशासनाकडून या संस्थांना सतत मदत केली जाईल. गटशिक्षणाधिकारी पोपट काळे म्हणाले, शिक्षण विभागानेही आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

  हर्षल लोहकरे म्हणाले, प्रयोगवन व समाजबंध या संस्थांकडून माणूस उभा करण्याचे उपक्रम सातत्याने हाती घेतले जातात. या उपक्रमांना समाजाने पाठबळ देणे आवश्‍यक आहे. प्रास्ताविकात प्रयोगवनचे अध्यक्ष सत्तार शेख म्हणाले, वंचित उपेक्षित व आर्थिक दुर्बल घटकातील कुठलेही मुल शिक्षणापासून वंचित राहु नये यासाठी प्रयोगवन , समाजबंध, कस्तुररत्न फाऊंडेशन, स्नेहग्राम या चार संस्थांनी गेल्या दोन महिन्यांपासुन शैक्षणिक साहित्य संकलनाची मोहिम राज्यभर हाती घेतली.

  स्नेहग्राम व कस्तुररत्न फाऊंडेशनने मागील आठवड्यात सोलापुर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात 25 विद्यार्थ्यांना, तर नुकतेच  प्रयोगवन व समाजबंध यांनी जामखेड तालुक्यातील 15 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. शैक्षणिक साहित्य वाटपाचा पहिला टप्प्या आज पुर्ण झाला असल्याचे शेख म्हणाले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजय वारभोग यांनी केले. तर आभार केंद्रप्रमुख निळकंठ घायतडक यांनी मानले. विद्यार्थ्यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.

  Post Top Ad

  Post Bottom Ad