Header Ads

 • Breaking News

  शेवगावात एकाच कुटुंबातीच चौघांची निघृण हत्या


  शेवगाव । DNA Live24 - एकाच कुटुंबातील चौघा जणांची निघृण हत्या केल्याचा प्रकार रविवारी सकाळी समोर आला. विद्या कॉलनीत राहणाऱ्या हरवणे कुटुंबियांतील चौघांची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या करण्यात आली. चोरीच्या उद्देशाने हत्याकांड झाल्याचे दिसत असले तरी खरे कारण वेगळेच असल्याचा संशय आहे. हत्या करण्याची पद्धत पाहून पोलिसही चकीत झाले आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा शेवगावात तळ ठोकून अाहेत. 

  लष्करातून सेवानिवृत्त झाल्यानंतर भूमी अभिलेख कार्यालयात नोकरीला असलेले अप्पासाहेब गोविंद हरवणे (वय ५८), त्यांची पत्नी सुनंदा अप्पासाहेब हरवणे (४८), मुलगी स्नेहल (१९) व मुलगा मकरंद (१४) अशी हत्या झालेल्या चौघांची नावे आहेत. रविवारी सकाळी त्यांचा दूधवाला आला असता आवाज देवूनही कोणी बाहेर आले नाही. घराचा दरवाजा उघडाच असल्याने दूधवाल्याने डोकावले असता हत्याकांड दृष्टीस पडले.

  ही घटना समजताच शेवगावचे पोलिस उपअधीक्षक अभिजीत शिवथरे, पोलिस निरीक्षक सुरेश सपकाळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिस अधीक्षक रंजकुमार शर्मा, श्रीरामपूरचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक रोहिदास पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार, सहायक निरीक्षक संदीप पाटील, फौजदार राजकुमार हिंगोले यांच्यासह मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.

  अप्पासाहेब हरवणे लष्करी सेवेतून निवृत्त झालेले होते. सध्या भूमी अभिलेश विभागात होते. शेवगावजवळच्या वडुले येथील ते रहिवासी होते. काही वर्षांपूर्वी शेवगावात आले होते. विद्यानगर एरिगेशन कॉलनी दाट लोकवस्तीचा भाग आहे. तरीही हा प्रकार सकाळपर्यंत कोणाच्या लक्षात आला नाही. पोलिस आल्यानंतर शेजाऱ्यापाजाऱ्यांना हत्याकांडाची माहिती समजली. 

  धारदार शस्त्राने चौघांची हत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. बेडरुममधील कपाटातील सामान अस्ताव्यस्त होते. दरवाजाचा कडीकोयंडा किंवा कुलूपही तोडलेले नव्हते. घराबाहेर एक पांढऱ्या रंगाचा हातमोजा पोलिसांना सापडला. श्वानपथकाने घरापासून रस्त्यापर्यत माग काढला. न्यायवैद्यकीय विभाग व ठसेतज्ज्ञांनीही घटनास्थळाची पाहणी केली. याप्रकरणी सुनंदा हरवणे यांच्या भावाने शेवगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास गुन्हे शाखेचे पीआय दिलीप पवार हे करीत आहेत.

  चोरीचा बनाव - हरवणे कुटुंबियांची हत्या करुन घरातील सामानाची उचकापाचक केल्यामुळे प्रथमदर्शनी हा चोरीचा प्रकार वाटतो. पण सुनंदा यांच्या अंगावरील दागिने व अप्पासाहेब यांच्या खिशातील पैसे तसेच होते. कपाटाची उचकापाचक करुन कपडे अस्ताव्यस्त केलेले होते. त्यामुळे चोरीच्या उद्देशाने हत्याकांड झाल्याचे भासवले आहे. घराचा दरवाजा उघडाच होता. हत्येपूर्वी चौघांना गुंगीचे औषध दिल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

  ती वाचली - सुनंदा हरवणे यांची सख्खी बहिण विद्यानगर कॉलनीतच रहाते. त्यांनाही सकाळी हत्याकांडाची माहिती मिळाली. अप्पासाहेब व कुटुंबियांचे स्वभाव सरळमार्गी होते. हरवणे कुटुंबियांचे कोणाशीही वैमनस्य नव्हते. त्यांची एक मुलगी शिक्षणासाठी परगावी होती. त्यामुळे ती वाचली. या हत्याकांडाचे नेमके कारण काय, असा प्रश्न आता सर्वांना पडला आहे.

  आज शेवगाव बंद - चौघांच्या मृतदेहांचा शवविच्छेदनपूर्व पंचनामा करुन पोलिसांनी शवविच्छेदनासाठी हे मृतदेह औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात रवाना केले. सायंकाळी उशिरापर्यंत मृतदेह शेवगावात आलेले नव्हते. चौघांवरही त्यांच्या मूळ गावी वडुले येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या हत्याकांडाच्या निषेधार्थ शेवगाव ग्रामस्थांनी सोमवारी शेवगाव बंदची हाक दिली आहे.

  कसून तपास सुरू - हत्याकांडाच्या गुन्ह्याचा पोलिस दल शर्थीचे तपास करीत आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा शेवगावात तळ ठाेकून आहेत. शेवगाव पोलिस, उपअधीक्षक, एलसीबीची दोन पथके, व श्रीरामपूरच्या अतिरिक्त पोलिस अधीक्षक कार्यालयाचे मिळून एकूण ५ तपास पथके तपासात आहेत. खुनाचे कारण शोधून आरोपींना पकडण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.

  शेवगावातील हरवणे कुटुंबियांची हत्या झाल्याचे समजल्यानंतर घटनास्थळी झालेली बघ्यांची गर्दी.

  Post Top Ad

  Post Bottom Ad