Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

शनिवार, ३ जून, २०१७

शेतकरी संपामुळे घोडेगावच्या बाजारात शुकशुकाट

घोडेगावच्या आठवडे बाजारातील शुकशुकाट - छायाचित्र साैजन्य - दादा दरंदले, घोडेगाव

घोडेगाव । दिलीप शिंदे - शेतकऱ्यांच्या संपामुळे जनावरांसाठी राज्यभरात प्रसिद्ध असलेला घोडेगावचा (ता. नेवासे) येथील बाजाराकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली. तर भाजीपाल्याच्या बाजारात अक्षरश: शुकशुकाट होता. नेवासे तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीने (गुरूवारी) पहिल्या दिवशीच शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा दर्शविला होता. त्यानुसार तालुक्यातील बाजार बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. परिणामी भाजीपाल्याच्या बाजाराकडे शेतकरी फिरकलेच नाहीत.

घोडेगावने एक दिवस अगोदरच शुक्रवारचा आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. गुरुवारी सायंकाळीच ग्रामपंचायतीच्या ध्वनीक्षेपकावरुन ग्रामस्थांना शेतकरी संपामध्ये सहभागी होण्याचे, शुक्रवारचा आठवडे बाजार बंद राहिल, असे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार शुक्रवारी पहाटेपासूनच बाजारतळावर सुरू होणारी लगबग आज दिसली नाही. बाजारतळावर शुकशुकाट होता. 

शेतकऱ्यांच्या आंदोलनाची खिल्ली उड़विणाऱ्या भाजप नेते माधव भंडारी यांच्या वक्तव्याचा घोडेगावात शुक्रवारी सकाळी निषेध करण्यात आला. यावेळी घोडेगावचे ग्रामस्थ, शेतकरी महिलांनी भंडारी यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. भंडारी यांना नगर जिल्ह्यात आल्यानंतर प्लास्टिकच्या फळेभाज्यांचा उपहार देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. एरव्ही बाजारात पाय ठेवायला जागा नसते. पण संपामुळे आठवडे बाजार बंद राहिल्यामुळे नागरिकांचे हाल होणार आहेत. 

सकाळी साडे नऊ वाजेपर्यंत घोडेगावातील बाजार समिती उपआवाराच्या प्रवेशद्वारात रास्ता रोको आंदोलन झाले. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या संतापाला वाट मोकळी करुन दिली. या आंदोलनात माजी उपसभापती दिलीप लोखंडे, ज्ञानदेव कोरडे, रामदास सोनवणे, खरेदी विक्री संघाचे संचालक दत्तात्रय बऱ्हाटे, संदीप कुऱ्हाडे, नानासाहेब रेपाळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन नायब तहसिलदार ज्योतिप्रकाश जायकर यांनी स्वीकारले.

Post Top Ad

Your Ad Spot

Pages