728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

जितू भाटिया खून प्रकरण : पत्नीसह प्रियकरास जन्मठेप


अहमदनगर । DNA Live24 - प्रतिष्ठित व्यापारी जितेंद्र उर्फ जितू मोहनलाल भाटिया यांच्या खून प्रकरणी दोषी ठरवून न्यायालयाने त्यांच्या पत्नीसह तिच्या प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. जिल्हा न्यायाधीश एस. व्ही. माने यांनी शनिवारी दुपारी हा निकाल दिला. हेमा उर्फ दिव्या जितेंद्र भाटिया (३२, रा. तारकपूर) व प्रदीप उर्फ शप्पू जनार्दन कोकाटे (२४, रा. सिद्धार्थनगर) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. प्रदीपला पिस्तुल पुरवणाऱ्या विक्रम उर्फ गोट्या किशोर बेरड याला ४ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा झाली आहे.

२७ एप्रिल २०१४ रोजी गंजबाजारात सायंकाळच्या सुमारास गावठी पिस्तुलातून गोळ्या झाडून जितू भाटिया यांचा खून झाला. त्यामुळे अख्खे शहर हादरले. व्यापारी वर्गात दहशत पसरली. तत्पूर्वी त्यांच्या कुटुंबियांच्या मोबाईलवर ३० लाख रुपयांच्या खंडणीसाठी फोन येत होते. कोतवालीचे तत्कालीन पोलिस निरीक्षक बाळकृष्ण हनपुडे, गुन्हे शाखेचे निरीक्षक अशोक ढेकणे यांच्या पथकांनी तपास केला. काही दिवसांनी पोलिसांनी सिद्धार्थनगरमधून प्रदीपला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली देत मोबाईल व पिस्तुल पोलिसांच्या स्वाधीन केले.

प्रदीपच्या अटकेनंतर गुन्ह्याच्या तपासाला कलाटणी मिळाली. भाटिया यांच्या खुनामागे खंडणी नव्हे, तर प्रेमसंबंधातील अडथळा, हे मुख्य कारण असल्याचे निष्पन्न झाले. प्रदीप काेकाटेचे जितू भाटिया यांची पत्नी हेमासोबत प्रेमसंबंध होते. पोलिसांनी हेमालाही अटक केली. तिनेही गुन्ह्याची कबुली दिली. आधार कार्ड केंद्रावर तिची प्रदीपसोबत आेळख झाली होती. याच ओळखीचे रुपांतर नंतर प्रेमसंबंधांत झाले. त्यात जितू भाटिया यांचा अडथळा येत असल्याने दोघांनी जितू भाटिया यांचा कट रचून काटा काढला. गुन्हा करण्यासाठी प्रदीपला विक्रम बेरडने गावठी पिस्तुल पुरवले होते.

पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक करुन या गुन्ह्याचा सर्व तपास पूर्ण केला. न्यायालयात दोषारोपपत्र पाठवण्यात आले. या खटल्यात सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील अनिल एम. घोडके यांनी काम पाहिले. त्यांनी सरकार पक्षातर्फे एकूण तब्बल ४१ साक्षीदार तपासले. त्यात तत्कालीन जिल्हाधिकारी अनिल कवडे, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, नोडल ऑफिसर व तपासी अधिकारी हनपुडे, अशोक ढेकणे यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. खटल्यातील साक्षीपुरावे ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपींना जन्मठेपेसह विविध कलमान्वये शिक्षा व आर्थिक दंड ठोठावला.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: जितू भाटिया खून प्रकरण : पत्नीसह प्रियकरास जन्मठेप Rating: 5 Reviewed By: DNA Live24