728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

हिवरे बाजारच्या मुलांनी साधला अमेरिकेत संवाद


अहमदनगर । DNA Live24 - तालुक्यातील हिवरे बाजार येथे शाळेच्या पहिल्याच दिवशी सकाळी न्युजर्सी अमेरिका येथून किशोर गोरे यांच्याशी हिवरे बाजार प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी संवाद साधला. व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे मुलांनी दोन तास गाेरे यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी सरपंच पोपटराव पवार, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, तसेच पालकही उपस्थित होते.

साडेदहा ते साडेबारा, असा सुमारे दोन तास विविध विषयांवर चर्चा, मार्गदर्शन व प्रश्नोत्तरे झाली. यात अमेरिका व भारतातील शाळा, विद्यार्थी, पर्यावरण, शिस्त, जीवन कौशल्ये, शाळेत पालकांचा सहभाग, राहणीमान यांसह विविध बाबतीत असणारे साम्य व फरक विद्यार्थ्यांना समजले. नवनवीन गोष्टींचा परिचय झाला. गोरे यांनी कौटुंबिक बाबींसह सर्व बाबींना उजाळा दिला.

या संवादामुळे विद्यार्थ्यांना गोरे यांनी मी तुमच्यातीलच एक असल्याची जाणीव करून दिली. काही विद्यार्थ्यांनी गोरे यांना स्वरचित कविता एेकवल्या. त्यांनीही टाळ्या वाजवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हिवरे बाजारला ग्लोबल हाऊसमध्ये येण्याचे निमंत्रण विद्यार्थ्यांनी गोरे यांना दिले. तर अमेरिकेला येण्याचे निमंत्रण गोरे यांनी विद्यार्थ्यांना दिले.

पोपटराव पवार यांच्यासारखे आदर्श व्यक्तिमत्व आपल्यासमोर असल्यामुळे हिवरे बाजारच्या शाळेतील विद्यार्थी भाग्यवान असल्याचे त्यांनी सांगितले. महिन्यातून एकदा विद्यार्थ्यांशी, ग्रामस्थांशी, निरनिराळ्या विषयावर संवाद करण्याची इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे, शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्यामुळे आज पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना अमेरिकेची सहल करता आल्याचे पोपटराव पवार यांनी सांगून आभार मानले.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: हिवरे बाजारच्या मुलांनी साधला अमेरिकेत संवाद Rating: 5 Reviewed By: DNA Live24