728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तानला नमवून भारताची विजयी सलामी !


बर्मिंगहॅम । DNA Live24 - टीम इंडियाच्या टॉप ४ फलंदाजांच्या अर्धशतकाच्या बळावर टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध दणदणीत विजयश्री संपादन केली. भारताने आधी बॅटिंग करताना निर्धारित ४८ षटकांत ३ बाद ३१९ धावा काढल्या. तब्बल १२५ धावांनी पाकिस्तानचा अक्षरश: धुव्वा उडवत भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीत विजयी सलामी दिली.

भारताकडून रोहित शर्माने ९१, शिखर धवनने ६८, कर्णधार विराट कोहलीने नाबाद ८१, युवराज सिंगने ५३, तर हार्दिक पंड्याने नाबाद २० धावा काढल्या. पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ दोनदा थांबला. नंतर सामना प्रत्येकी ४८ षटकांचा झाला. पाकिस्तानला डकवर्थ लुईस नियमाने ४८ षटकांत ३२४ धावांचे लक्ष्य देण्यात आले. ३ बाद ३१९ धावा हा आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध भारताचा सर्वोच्च स्कोअर ठरला. याआधी पाकविरुद्ध ७ बाद ३०० हा सर्वोच्च स्कोअर होता. टीम इंडियाने तो २०१५ च्या विश्वचषकात केला होता.

पाकिस्तानविरुद्ध ३९ वर्षांत प्रथमच वनडेत भारताच्या टॉप ४ फलंदाजांनी ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा काढल्या. एकूणच वनडेत सर्व संघाविरुद्ध मिळून तिसऱ्यांदा भारताच्या टॉप-४ फलंदाजांनी ५०+ चा स्कोअर केला. उर्वरित दोन वेळेस इंग्लंडविरुद्ध भारताने अशी कामगिरी केली. भारताकडून हार्दिक पंड्याने अखेरच्या षटकांत ३ षटकार ठोकले.

१० षटकांत ११७ धावा - भारताने अखेरच्या १० षटकांत ११७ धावा तर अखेरच्या ४ षटकांत ७२ धावा ठोकल्या. अखेरच्या षटकात २३ धावा काढल्या. इमान वसीमच्या या षटकात हार्दिक पंड्याने पहिल्या तीन चेंडूंवर ३ षटकार मारले. चौथा चेंडू निर्धाव पडला. पाचव्या चेंडूवर एक धाव तर अखेरच्या चेंडूवर कोहलीने चौकार मारला. पंड्याने अवघ्या ६ चेंडूंत नाबाद २० धावा ठोकल्या.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तानला नमवून भारताची विजयी सलामी ! Rating: 5 Reviewed By: DNA Live24