अहमदनगर । DNA Live24 - कोतवाली पोलिसांनी मार्केटयार्ड परिसरात दोन संशयित व्यक्तींकडून पोलिसांनी सापळा रचून २६ लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. ही कारवाई बुधवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी दोघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची चौकशी सुरू असून ही रोकड हवाला रॅकेटमधील असल्याचा प्राथमिक अंदाज कोतवाली पोलिसांनी वर्तवला आहे. मात्र, गुरुवारी सायंकाळपर्यंत रोकडबाबतचा खुलासा झालेला नव्हता.
बुधवारी रात्री मार्केटयार्ड परिसरात हवाला रॅकेटमार्फत मोठी रोकड येणार असल्याची माहिती कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अभय परमार यांना मिळाली होती. त्यामुळे पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील, शहर विभागाचे सहायक पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिसांनी मार्केटयार्ड परिसरात सापळा लावला. पोलिसांनी मार्केटयार्ड परिसर पिंजून काढला, मात्र त्यांना कोणीही संशयित मिळाले नाही.
रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास एका दुचाकी वाहनावरुन आलेले दोघा जणांच्या हालचाली पोलिसांना संशयास्पद वाटल्या. त्यामुळे पोलिसांनी त्यांना हटकले. त्या दोघांनीही वेगाने तेथून पळण्याचा प्रयत्न केला. पण, पोलिसांनी त्यांना शिताफीने पकडले. पोलिसांनी घेतलेल्या झडतीमध्ये त्यांच्याकडे २६ लाख रुपयांची रोकड मिळाली. ही रोकड कोठून आणली, कोणाची आहे, कोणाला द्यायची आहे, या प्रश्नांची दोघांनीही व्यवस्थित उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
दोघांची नावे रणजित सोळंकी व अजय उर्फ पप्पू सोळंकी (दोघेही गुजरात) अशी असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी त्यांच्याकडून रोकड जप्त करुन दोघांनाही पोलिस ठाण्यात आणले. ५०० रुपयांच्या नोटांचे १३ लाख, १०० रुपयांच्या नोटांचे ३ लाख, तर उर्वरित २ हजार रुपयांच्या नोटा मिळून एकूण २६ लाख रुपयांची रोकड होती. पोलिसांनी इलेक्ट्रॉनिक मशीनच्या साह्यान या नोटा मोजून त्यांचा पंचनामा केला. गुरूवारी सायंकाळपर्यंत चौकशीच सुरू होती.