शेवगावातील हरवणे कुटुंबियांच्या हत्याकांडाचा उलगडा, दरोडेखोरांचेच कृत्य !


अहमदनगर । DNA Live24 - शेवगावातील हरवणे कुटुंबियांच्या थरकाप उडवणाऱ्या हत्याकांडातील संशयित दरोडेखाेरांना पोलिसांनी थरारक पाठलाग करुन पकडले. नेवासे तालुक्यातील बाभूळखेडा शिवारात रविवारी सकाळी पोलिसांनी ही कारवाई केली. दरोडेखोरांनी पोलिसांवर गोळीबार व गलोलीतून दगडफेक केली. दोन दरोडेखोर पळून गेले. तर दोघांना पोलिसांनी पकडले. दरोडा टाकण्याच्या उद्देशातूनच हरवणे कुटुंबियांची हत्या केल्याची कबुली त्यांनी दिली आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अप्पासाहेब गोविंद हरवणे (वय ५०), त्यांची पत्नी सुनंदा (४५), मुलगी स्नेहल (२१) व मुलगा मकरंद (१४) यांची १८ जूनला पहाटे हत्या झाली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी दूधवाला आल्यानंतर हत्याकांड उजेडात आले. गुन्ह्याची पद्धत पाहून पोलिसही चक्रावले होते. तब्बल दहा तपास पथके आरोपींच्या शोधासाठी नेमली होती.

लोकल क्राईम ब्रांचचे पीआय दिलीप पवार, एपीआय संदीप पाटील, शरद गोर्डे, फौजदार सुधीर पाटील, राजकुमार हिंगोले, श्रीधर गुट्टे, पोलिस नाईक सुनिल चव्हाण, अंकुश ढवळे, सोनई पोलिस ठाण्याचे एपीआय किरण शिंदे, यांच्यासह नेवासा व क्राईम ब्रांचचे सहा वेगवेगळी पथके तयार केली. नेवासा पोलिस स्टेशनपासून १५ किमी अंतरावर असलेल्या पिचडगाव (बाभूळखेडा शिवार) येथे एका शेतामध्ये सकाळी ७ वाजताच चोहोबाजूनी सापळा लावण्यात आला.

गोळीबार - संशयित दरोडेखोर सुरेश विधाटे यांच्या शेतात लपले होते. पोलिसांना पाहून दोन दरोडेखोर काळ्या रंगाच्या पल्सरवरून वेगाने पोलिसांवर आले. त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता पाठीमागे बसलेल्या दरोडेखोराने गावठी पिस्तुलातून पोलिसांच्या दिशेने गोळी झाडली. त्यामुळे पोलिस जमिनीवर झोपले. ही संधी साधून दोन्ही दरोडेखोर पळून गेले.

दगडफेक - पुन्हा दोन दरोडेखोर पोलिसांच्या दिशेने वेगाने आले. पण, दुचाकी घसरुन ते खाली पडले. पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता एकाने पोलिस नाईक मनोज गोसावी यांच्या दिशेने धारदार शस्त्र फेकले. दुसऱ्याने गलोलीने पोलिस सचिन अडबल यांच्या दिशेने दगड मारले. त्याच वेळी इतर पोलिसांनी त्याला झडप घालून पकडले.

शोधमोहिम - पोलिसांना शस्त्र मारणारा दरोडेखोर उसात लपला. तीन तासांनी त्याला शोधण्यात यश आले. दरोडेखोर ऊसाचे पाचरट अंगावर घेऊन सरीत झोपलेला होता. दोघांनी त्यांची नावे उमेश हरिसिंग भोसले (रा. दिघी, नेवासे) व अल्ताफ छगन भोसले (मुकिंदपूर, नेवासे) अशी सांगितली.

सराईत - हरिसिंग भोसले व रमेश छगन भोसले हे पोलिसांवर गोळीबार करुन जळका फाट्याच्या दिशेने गेले. रमेशवर गंगापूर येथे अशाच गुन्ह्याची नोंद आहे. तेथेही त्याने दरोडा टाकू खून केलेला आहे. चाळीसगाव येथे त्याच्यावर मोक्काचा गुन्हा आहे. शेवगाव हत्याकांड केल्यानंतर स्नेहलच्या गळ्यातील चोन्याची चेन व एक गंठण चोरल्याची कबुली त्यांनी दिली.

असा केला गुन्हा - गेल्या रविवारी नेवासे रोडवर एका पेट्रोल पंपाजवळ आले. एका लिंबाच्या झाडाखाली गाडी लावली. तेथेच जेवण करुन झोपले. रात्री विद्यानगर कॉलनीत आले. पाठीमागच्या दरवाजातून आत प्रवेश केला. हत्याकांड करुन दरोडा टाकला. जाताना जिन्यातील दरवाजातून सर्व पसार झाले.

खबऱ्यांचे नेटवर्क - काही वर्षांपूर्वी नेवासे शहरात व घोडेगाव (ता. नेवासे) अशाच प्रकारे दरोडा व खून झाले होते. शेवगावचे हत्याकांडही त्याच पद्धतीचे होते. पोलिस नाईक सुनिल चव्हाण तेव्हा एलसीबीत होते. अशा दरोडेखाेरांची "मोडस आॅपरेंडी' त्यांना माहिती आहे. त्यांचे वैयक्तिक खबऱ्यांचे नेटवर्कही या गुन्ह्यात कामी आले. अन् आरोपींना सर्वांनी एकत्रितपाणे जेरबंद केले.