728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

वॉचमनच्या टोळीने दिली घरफोड्यांची कबुली


अहमदनगर । DNA Live24 - घराची, इमारतीची, कार्यालय, बांधकाम साईट्सच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवतात. असा एक वॉचमनच घरफोडी करणाऱ्या चोरट्यांचा टोळीप्रमुख निघाला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुुरूवारी दुपारी सिनेस्टाईल पाठलाग करुन पकडलेल्या चोरट्यांच्या टोळीमुळे हा प्रकार उजेडात आलेला आहे. सावेडीत एका इमारतीच्या बांधकामावर वॉचमन म्हणून काम करताना त्याने शेजारच्या इमारतींमध्ये रेकी केली. अन् मुलांसह साथीदारांच्या टोळीने लागोपाठ दोन ठिकाणी घरफोड्या करुन लाखोंचा ऐवज लांबवला होता.

पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, घरफोड्या करणारे काही संशयित आरोपी सावेडी परिसरात येणार आहे. त्यामुळे त्यांच्यासह अतिरिक्त पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पाेलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकाने सावेडीतील गुलमोहोर रोड परिसरात सापळा रचला. गुलमोहोर रोडवर दोन संशयित व्यक्ती बजाज पल्सर मोटारसायकलवर फिरत असल्याचे पोलिसांनी पाहिले. त्यांना हटकले असता त्यांनी वेगाने धूम ठोकली.

पोलिसांनी पाठलाग करुन त्यांना पकडले व चौकशी केली. त्यांनी त्यांची नावे मनोज गोरख मांजरे (वय १९) व काळू बाबुलाल जाधव (१९, दोघेही रा. निर्मलनगर, पाईपलाईन रोड) अशी सांगितली. अधिक विचारपूस केली असता त्यांच्याकडे असलेली मोटारसायकल चोरीची असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. मोटारसायकल आपल्या छोट्या भावाने त्याच्या मित्रासह चोरल्याची कबुली त्यांनी दिली. तसेच गुलमोहोर रोड परिसरात एका घरामध्ये आठवडाभरापूर्वी घरफोडी केल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले. 

पोलिसांनी दोघांसह त्याच्या लहान भावाचा शोध सुरू केला. त्यांच्या घरी गेले असता पोलिसांना मनोजचे वडील गोरख मारुती मांजरे (वय ४४, रा. निर्मलनगर) भेटले. तर छोटा भाऊ मात्र पोलिसांना पाहून पळून गेला. पोलिसांनी गोरख मांजरे यांची चौकशी केली असता ते कोहिनूर मंगल कार्यालयामागे एका बांधकाम साईटवर वॉचमन म्हणून काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. एक आठवड्यापूर्वी याच परिसरात दोन ठिकाणी घरफोड्या झाल्या होत्या. चौकशीअंती गोरख मांजरेनेच मुलांसह हे गुन्हे केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी मनोज मांजरे, काळू जाधव व गोरख मांजरे यांना ताब्यात घेऊन तोफखाना पोलिसांच्या हवाली केले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप पाटील, पोलिस हेड कॉन्स्टेबल योगेश गोसावी, मन्सूर सय्यद, उमेश खेडकर, पोलिस नाईक विशाल अमृते, दत्ता हिंगडे, संदीप पवार, रावसाहेब हुसळे, रविकिरण सोनटक्के, दिपक शिंदे, प्रमोद जाधव, संदीप घोडके, कॉन्स्टेबल योगेश सातपुते, चालक सचिन कोळेकर यांच्या पथकाने ही कामगिरी केली. या सर्व आरोपींची अधिक चौकशी आता तोफखाना पोलिस करीत आहेत.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: वॉचमनच्या टोळीने दिली घरफोड्यांची कबुली Rating: 5 Reviewed By: DNA Live24