Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

मंगळवार, २५ जुलै, २०१७

आकांक्षा लॉजमधील वेश्या व्यवसायावर छापा


अहमदनगर । DNA Live24 - आकांक्षा लॉजमध्ये (स्वस्तिक चौक, बुरूडगाव रोड, नगर) सुरू असलेल्या कुंटणखान्यावर सहायक पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्या पथकाने छापा टाकला. रविवारी मध्यरात्री केलेल्या या कारवाईत ३ महिलांची सुटका करण्यात आली. लॉजमालक विलास बाबुराव आगरकर याच्यासह ७ जणांविरुद्ध अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायदा कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सुटका केलेल्या महिलांना पुनर्वसनासाठी स्नेहालयात दाखल केले आहे.

स्वस्तिक चौकातील आकांक्षा लॉजमध्ये अनैतिक वेश्याव्यवसाय चालतो, अशी माहिती सहायक पोलिस अधीक्षक शिंदे यांना गुप्त बातमीदाराकडून मिळाली होती. त्यामुळे पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अक्षय शिंदे, महिला फौजदार कल्पना शिरदावडे, हेड कॉन्स्टेबल सुपेकर, गणेश चव्हाण, सचिन जाधव, अभिजीत अरकल, संतोष ओव्हाळ, प्रविण जरे, युवराज गिरवले, महिला पोलिस दुर्गा कांदळकर यांनी रविवारी मध्यरात्री छापा टाकला.

विलास आगरकर व त्याचा मुलगा युवराज हे आकांक्षा लाॅजमध्ये रुम भाड्याने देवून महिलांकडून बळजबरीने वेश्या व्यवसाय करवुन घेत असल्याची पोलिसांची खात्री झाली. त्यामुळे पोलिसांनी तीन महिलांची सुटका करुन आरोपींच्या ताब्यातून ३१ हजार ८०० रुपयांची रोकड, ६ हजारांचे मोबाईल जप्त केले. पोलिस हेड कॉन्स्टेबल सुयोग सुपेकर यांनी कोतवालीत याप्रकरणी फिर्याद दिली. त्यावरुन पोलिसांनी ७ जणांविरुद्ध स्त्रीया व मुली यांचा अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायदा कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे.

आरोपींमध्ये लॉजमालक विलास बाबुराव आगरकर (बुरूडगाव रोड), युवराज विलास आगरकर यांच्यासह ग्राहक म्हणून आढळलेल्या शिवाजी सहादु भांबरे (४३, सिन्नर, नाशिक), रोहित सुरेश परदेशी (२६, फकीरवाडा, मुकुंदनगर), कुणाल राजेंद्र गोटे (२२, विजयलाईन, भिंगार), रोहित शाम राऊत (२५, सारसनगर पुलाजवळ), राहुल बाबासाहेब बचाटे (२४, गोविंदपुरा, भिंगार) यांचा समावेश आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.
दोन दिवस पीसी - रविवारी मध्यरात्री छापा टाकल्यानंतर सोमवारी पहाटे कोतवाली पोलिस ठाण्यात पिटा कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला. सोमवारी दुपारी सातही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. लॉजमालक विलास आगरकर व त्याचा मुलगा युवराज आगरकर यांना न्यायालयाने प्रत्येकी दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तर ग्राहक म्हणून आलेल्या इतरांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. गुन्ह्याचा अधिक तपास फौजदार शिवाजी नागवे करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Top Ad

Your Ad Spot

Pages