728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

शेवगाव हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार अखेर जेरबंद


शेवगाव । DNA Live24 - अंगाचा थरकाप उडवणाऱ्या हरवणे कुटुंबियांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नेवासे तालुक्यातून ताब्यात घेतले. रमेश छगन भोसले (नागफणी, ता. नेवासे) असे त्याचे नाव आहे. रमेश याने शेवगाव हत्याकांडाची कबुली दिली आहे. तो नगरसह चार जिल्ह्यांमध्ये वाँटेड आहे. त्याने यापूर्वीही दरोडा टाकताना तिघांचा खून केलेला आहे. जळगाव पोलिसांना तो मोक्काच्या गुन्ह्यात वाँटेड होता. त्याच्याकडून एक गावठी पिस्तुल पोलिसांनी जप्त केले आहे.

लष्करातून सेवानिवृत्त होऊन भूमी अभिलेख कार्यालयात नोकरीला असलेल्या अप्पासाहेब गोविंद हरवणे (वय ५०), त्यांची पत्नी सुनंदा अप्पासाहेब हरवणे (४५), मुलगी स्नेहल (२१) व मुलगा मकरंद (१४) यांची १८ जूनला पहाटेच्या सुमारास हत्या झाली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी दूधवाल्याने पाहिल्यानंतर हे हत्याकांड उघडकीस आले होते. आरोपींची गुन्हा करण्याची पद्धत पाहून पोलिसही अचंबित झाले होते. त्यामुळे तब्बल १० पोलिस तपास पथके नेमलेली होती. वेगवेगळ्या दृष्टीने गुन्ह्याचा तपास सुरू होता.

२५ जूनला क्राईम ब्रांच व नेवासे पोलिसांनी बाभुळखेडा (ता. नेवासे) येथे सापळा रचून दोन संशयित आरोपींना पकडले. त्यावेळी रमेश भाेसले पोलिसांच्या दिशेने गोळीबार करुन फरार झाला. पण त्याच्या दोन साथीदारांना पोलिसांनी पकडले. त्यापैकी अल्ताफ छगन भोसले (मुकिंदपूर, नेवासे) याने शेवगाव हत्याकांडाची कबुली दिली. तर दुसरा आरोपी मात्र अल्पवयीन निघाला. तेव्हापासून पोलिस रमेश व त्याच्या इतर साथीदारांच्या शोधातच होते. शुक्रवारी तो नेवाशात आल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.

एसपी रंजनकुमार शर्मा, अॅडिशनल एसपी घनश्याम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकातील एपीआय शरद गोर्डे, संदीप पाटील, पोलिस हेड कॉन्स्टेबल योगेश गोसावी, सुनिल चव्हाण, मन्सूर सय्यद, उमेश खेडकर, मल्लिकार्जुन बनकर, विशाल अमृते, संदीप पवार, रावसाहेब हुसळे, मनोज गोसावी, दत्ता हिंगडे, रविंद्र कर्डिले, रविकिरण सोनटक्के, दिपक शिंदे, संदीप घोडके, योगेश सातपुते, सागर सुलाने, बाळासाहेब भोपळे यांच्या टीमने रमेशच्या मुसक्या आवळल्या.

पुन्हा काढले पिस्तुल - २५ जूनला बाभुळखेडा परिसरात पोलिसांना चकवा देवून पळताना रमेश भोसले याने पोलिसांच्या दिशेने गावठी पिस्तुलातून गोळीबार केला होता. त्यामुळे पोलिस जमिनीवर खाली झोपले. हीच संधी साधून रमेश वेगाने पसार झाला. ३० जूनला सकाळी त्याला पकडायला पोलिस गेले तेव्हाही त्याने पळण्याचा प्रयत्न केला. पण, पोलिसांनी त्याला पकडले. त्यावेळी कमरेला लावलेले पिस्तुल काढून त्याने उगारण्याचा प्रयत्न केला. या पिस्तुलात ३ जिवंत काडतुसं होती. पोलिसांने ते जप्त केले.

याआधीही केलेत खून - रमेश भोसले कुख्यात दरोडेखोर असून तो जळगाव, नाशिक, अहमदनगर व औरंगाबाद जिल्ह्यात वाँटेड आहे. चाळीसगाव (जि. जळगाव) येथे त्याने २०१५ मध्ये दरोडा टाकताना तीन खून केले होते. त्यामुळे जळगाव पोलिसांनी त्याच्याविरुद्ध मोक्का लावलेला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात गंगापूर शिवारात त्याने नातेवाईकालाच गोळ्या घालून ठार मारले होते. यावेळी अल्ताफ भोसलेही त्याच्यासोबत होता. या गुन्ह्यापासूनच तो फरार होता. शेवगाव हत्याकांडानंतर त्याने नाशिक जिल्ह्यातही एक दरोडा टाकल्याचे पोलिस सांगत आहेत.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: शेवगाव हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार अखेर जेरबंद Rating: 5 Reviewed By: DNA Live24