Header Ads

 • Breaking News

  संतापजनक ! ६५ वर्षीय महिलेवर बलात्कार..


  अहमदनगर । DNA Live24 - मिरावली पहाडावर दर्शनासाठी आलेल्या ६५ वर्षीय महिलेवर बलात्कार करुन तिला लुटल्याचा संतापजनक प्रकार उजेडात आला आहे. बलात्कार करणारा आरोपी अवघ्या २२ वर्षांचा आहे. ही घटना सोमवारी सकाळी साडेदहा ते ११ वाजेच्या सुमारास मिरावली पहाडाच्या पायथ्याशी घडली. पीडित महिलेनेच पहाडावरील विश्वस्तांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी दीड तासांतच आरोपीच्या मुसक्या आवळल्या. राजू दशरथ दुसुंगे (रा. वारुळवाडी, ता. नगर) उर्फ 'पेताड राजा' असे नराधम आरोपीचे नाव अाहे.

  पीडित महिला पुणे जिल्ह्यातील आहे. रविवारी आमावस्या निमित्त ती मिरावली पहाडावर दर्शनासाठी आली होती. रविवारी रात्री पहाडावरच मुक्काम करुन सोमवारी सकाळी पायी चालत ती टेकडी उतरत होती. त्यावेळी राजू दुसुंगे पाठीमागून हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकीवरुन आला. त्याने महिलेच्या जवळ गाडी थांबवून तुम्हाला खाली जायचेय का, मी सोडतो, असे म्हणून गाडीवर बसायला लावले. महिला त्याच्या गाडीवर बसली. मात्र, काही अंतरावर गेल्यानंतर राजाने बळजबरीने महिलेवर अत्याचार केला.

  बलात्कार केल्यानंतर राजा तिचा मोबाईल व रोकड हिसकावून तेथून पसार झाला. पीडित असहाय महिलेने पुन्हा टेकडीवर जाऊन देवस्थानच्या विश्वस्तांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी ही माहिती पोलिसांना कळवली. पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील यांच्या पथकातील पोलिस हेड कॉन्स्टेबल राजू वाघ, पोलिस नाईक भरत डंगोरे, अभय कदम, भिंगार कॅम्पचे सहायक पोलिस निरीक्षक कैलास देशमाने हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी गेले.

  राजू दुसुंगे उर्फ पेताड राजा हा महिलेला गाडीवर बसवून खाली घेऊन जाताना काही प्रत्यक्षदर्शींनी पाहिले होते. त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी त्याचा कसून शोध घेतला. दीड तासांतच त्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. पोलिसी हिसका दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पीडित महिलेवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वरिष्ठ पाेलिस अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देवून माहिती घेतली. याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा नोंदवून राजाला अटक करण्यात आली.

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  Post Top Ad

  Post Bottom Ad