Header Ads

 • Breaking News

  खून करुन साधूची घोडीही पळवली


  अहमदनगर । DNA Live24 - तालुक्यातील केकताई डोंगराच्या परिसरात तीन दिवसांपूर्वी खून झालेल्या साधूची घोडीही पळवण्यात आली आहे. केकताईतील आश्रमात दुहेरी हत्याकांड करणाऱ्या संशयित आरोपीनेच ही घोडी पळवली असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे पोलिसांनी आरोपीसोबतच आता या घोडीचाही शोध घेण्यास सुरूवात केली आहे.

  आरोपीचे छायाचित्र उपलब्ध करुन देणाऱ्यास पोलिसांनी यापूर्वीच १५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केलेेले आहे. वडगाव गुप्ता परिसरातील केकताई डोंगराच्या परिसरात असलेल्या आश्रमात गुरूवारी दुपारी एका साधू महाराजांसह त्यांच्या भक्ताचा जाळून खून करण्यात आला. सुदाम नामदेव बांगर उर्फ सूरजनाथ महाराज (रा. वडगाव गुप्ता) व यादव उर्फ बाबासाहेब बाबूराव कराळे (रा. शेंडी) अशी खून झालेल्या दोघांची नावे आहेत.

  याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात खुनाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण हे करीत आहेत. केकताई आश्रमाजवळच देवीचे मंदिर होते. काही दिवसांपूर्वी श्रीरामपूरहून एक युवक तेथे रहायला आला होता. तो स्वत:ला सूरजनाथ महाराज यांच्या सेवेकरी असल्याचे सांगत होता. गुरूवारी दुहेरी हत्याकांड झाल्यापासून तो फरार आहे. या युवकानेच हे हत्याकांड केल्याचा पोलिसांचा संशय आहे. तसेच आश्रमातील महाराजांची घोडीही तेव्हापासून गायब आहे. त्यामुळे पोलिस आता फरार असलेल्या संशयित युवकासह घोडीचाही शोध घेत आहेत. 

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  Post Top Ad

  Post Bottom Ad