728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास १२ वर्षे सक्तमजुरी


अहमदनगर । DNA Live24 - लहान बालकाच्या मदतीने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या अारोपीला दोषी ठरवून न्यायालयाने १२ वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. मल्हारी सखाराम उमाप (वय २५, रा. नांदगाव, ता. नगर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. 

जिल्हा व सत्र न्यायालयाने मंगळवारी दुपारी हा निकाल दिला. नगर तालुक्यातील नांदगावात ही घटना घडल्यानंतर एक वर्षाच्या आत जलदगतीने खटल्याचा निकाल लागला आहे. या खटल्यात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड. सतीश पाटील यांनी काम पाहिले.

पीडित मुलगी धुणी-भांडी घासण्याचे काम करते. मल्हारी उमाप याने शेजारी राहणाऱ्या एका लहान मुलाला पाठवून तिला भांडी घासायच्या बहाण्याने बोलावून घेतले. मुलगी घरी आली असता त्याने तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. त्यावेळी लहान मुलगा बाहेर राखण करत होता. पीडित मुलीने हा प्रकार घरी सांगितल्यानंतर तिची आई तिला पाेलिस ठाण्यात घेऊन गेली. पोलिसांनी मल्हारी उमाप व बालकाविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारापासून सरंक्षण, तसेच बलात्काराच्या कायदा कलमान्वये गुन्हा नोंदवला.

महिला फौजदार स्वाती देवडकर यांनी या गुन्ह्याचा तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यात एकूण १० साक्षीदार तपासण्यात आले. पीडित मुलगी, तिची आई, वैद्यकीय अधिकारी व तपासी अंमलदारांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. या खटल्यात डीएनए रिपोर्टही सकारात्मक आला होता. या सर्व बाबींच्या आधारे जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी आरोपीला दोषी ठरवून शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेपैकी ५ हजार रुपये पीडितेला देण्याचे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.

जलदगतीने निकाल - कोपर्डी (ता. कर्जत) येथील बलात्कार करुन मुलीचा खून केल्याचे प्रकरण घडल्यानंतर पुढच्याच आठवड्यात नांदगाव येथे हा प्रकार घडला होता. नगर ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी आनंद भोईटे व एमआयडीसी पोलिस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार देवडकर यांनी या गुन्ह्याचा तपास केला. विशेष म्हणजे कोपर्डी खटल्याचे कामकाज ज्यांच्यासमोर सुरू आहे, त्याच न्यायालयात या खटल्याची सुनावणी चालली. अन् एका वर्षाच्या आतच या खटल्याचा निकाल लागून आरोपीला शिक्षा झाली आहे.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास १२ वर्षे सक्तमजुरी Rating: 5 Reviewed By: DNA Live24