शेवगाव हत्याकांडातील तो आरोपी सज्ञानच


शेवगाव । DNA Live24 - शेवगाव येथील हरवणे हत्याकांडातील आरोपी अल्ताफ छगन भोसले हा सज्ञान असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिले आहे. तसेच त्याच्याविरुद्ध औरंगाबाद ग्रामीण व शहर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत दाखल असलेले चार गंभीर गुन्हेही निष्पन्न झाले आहेत. त्यामुळे त्याला पोलिसांनी पुन्हा न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्याला सराईत गुन्हेगार असल्याचे मान्य करून ९ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

शेवगावातील विद्यानगर कॉलनीत झालेल्या हरवणे कुटुंबियांच्या हत्याकांड प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तिघा जणांना ताब्यात घेतले होते. त्यापैकी एक आरोपी अल्पवयीन निघाल्यामुळे त्याची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली. तर अल्ताफ छगन भोसले नावाच्या आरोपीने अल्पवयीन असल्याचा दावा केला होता. त्यामुळे न्यायालयाने त्याचीही वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी त्याची वैद्यकीय तपासणी केली असता तो सज्ञान असल्याचे निष्पन्न झाले.

अल्ताफ भोसलेने दिलेल्या जन्माच्या दाखल्याची शहानिशा केली असता तो बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याविरुद्ध औरंगाबाद ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत भारतीय हत्यार कायदा, खुनाचा गुन्ह्याची नोंद आहे. त्यातही त्याची अल्पवयीन असल्याचा उल्लेख नव्हता. त्यामुळे तपासी अधिकारी तथा गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी त्याला न्यायालयासमोर हजर केले. तो सराईत असल्याचे स्पष्ट करीत त्याला पोलिस कोठडी देण्याची विनंती केली. न्यायालयाने ती मान्य करीत अल्ताफची रवानगी पुन्हा पोलिस कोठडीत केली.