728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

कोपर्डी खटला : मुख्यमंत्र्यांना साक्षीदार करण्याची मागणी आरोपीच्या वकिलांकडून मागे


अहमदनगर । DNA Live24 - काेपर्डी (ता. कर्जत)  खटल्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच बचाव पक्षाचा साक्षीदार करावे, अशी मागणी करणारा अर्ज आरोपीच्या वकिलांनीच स्वत:हून माघारी घेतला. आरोपी नितीन भैलुमेच्या वतीने त्याच्या वकिलांनी गेल्या वेळी हा अर्ज केला होता. शुक्रवारी मात्र दोन्ही बाजूच्या युक्तीवादानंतर त्यांनी स्वत:हून आपला अर्ज मागे घेतला. तर आरोपी संतोष भवाळतर्फे दिलेल्या बचाव पक्षाच्या सहा साक्षीदारांच्या यादीवर दोन्ही बाजूच्या वकिलांनी जोरदार युक्तीवाद केला. या अर्जावर आता १० जुलैला सुनावणी होइल.

कोपर्डी खटल्याचे कामकाज जिल्हा सत्र न्यायालयात सुरू आहे. सरकार पक्षाने त्यांचे सर्व साक्षीदार तपासले आहेत. तसेच तिन्ही आरोपींचे जबाबही नोंदवून झाले आहेत. आरोपी संतोष भवाळतर्फे बचाव पक्षाच्या ६ साक्षीदारांची यादी न्यायालयात दिलेली होती. त्यात रवींद्र चव्हाण, अॅड. उज्ज्वल निकम, डॉ. राजेंद्र थोरात (स्टेट ब्युरो ऑफ हेल्थ इंटेलिजन्स), डॉ. उदय निरगुडकर (वृत्तवाहिनीचे संपादक), नाशिकच्या न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेचे डायरेक्टर व जिल्हाधिकारी अभय महाजन यांचा समावेश होता.

आरोपी भवाळच्या वकिलांनी हे सर्व साक्षीदार तपासणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी त्याला विरोध केला. ही यादी म्हणजे निव्वळ वेळकाढूपणा असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री न्यायालयाबाहेर काय बोलले, याला खटल्यात महत्व नाही. जनतेला धीर देण्याकरिता या खटल्यात आपली नियुक्ती करणे त्यांना आवश्यक वाटले असावे, असा युक्तीवाद अॅड. निकम यांनी केला. भय्यूजी महाराज जळगावात आपल्या घरी आल्याचे अॅड. निकम यांनी मान्य केले. मात्र, त्यावेळी त्यांच्यासोबत पीडितेचे नातेवाईक नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

युक्तीवाद करताना आरोपीच्या वकिलांनी राज्यभर निघालेल्या मोर्चांचा उल्लेख केला होता. त्यावर बाजू मांडताना निकम यांनी मोर्चे निघाल्याचेही मान्य केले. मात्र, राज्यभरात प्रथमच शांततापूर्ण पद्धतीने असे मोर्चे निघाल्याचे ते म्हणाले. अशा पद्धतीने मोर्चे काढण्याचा धडा इतरांनीही गिरवावा, असे निकम म्हणाले. डॉक्टरांची साक्ष घेण्यासही त्यांनी विरोध केला. मी स्वत: बचाव पक्षाचा साक्षीदार होऊ शकत नाही, तसे झाले तर ते व्यावसायिक गैरवर्तन ठरेल, असा युक्तीवाद निकम यांनी केला.

अत्याचार नाही - डॉ. राजेंद्र थोरात व नाशिकच्या न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेच्या संचालकांची साक्ष घेण्यासही अॅड. निकम यांनी विरोध केला. दुसऱ्या क्रमांकाचा आरोपी संतोष भवाळ याच्याविरुद्ध कुठलाही वैद्यकीय पुरावा नाही. त्याने बलात्कार केल्याचेही सरकार पक्षाचे म्हणणे नाही. सरकार पक्षाने तपासलेल्या डॉक्टरांनीही उलटपासणीत अॅड. निकम त्यांना मार्गदर्शन केल्याचे अमान्य केलेले आहे. त्यामुळे डॉक्टरांची व रासायनिक तज्ज्ञांची साक्ष घेण्यात काय अर्थ आहे, असा सवाल निकम यांनी उपस्थित केला. बचाव पक्षाच्या साक्षीदारांची यादी म्हणजे निव्वळ वेळकाढूपणा असल्याचा युक्तीवाद त्यांनी केला.

पत्रकारांना अडवले - कोपर्डी खटल्याच्या वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांना न्यायाधीशांच्या दालनाबाहेरच अडवण्यात आले. न्यायालयानेच तशा सूचना केल्याचे पोलिसांनी सांगितले. आश्चर्य म्हणजे ही सुनावणी 'इन कॅमेरा' नसूनही पत्रकारांना प्रवेश नाकारला. मध्यंतरी आरोपींवर हल्ला झाल्यामुळे न्यायालयाने दोन्ही पक्षाचे वकील वगळता इतरांना न्यायदान कक्षात प्रवेश करण्यास मनाई केली होती. त्यामुळे वार्तांकन करण्यासाठी काही पत्रकारांनी सुनावणीला बसू द्यावे, असा अर्ज केला. त्यावर दोन्ही बाजूंच्या वकिलांचे व पोलिसांचे म्हणणे ऐकून कोर्टाने अर्जदार पत्रकारांना दालनात बसण्याची परवानगी दिली होती. शुक्रवारी मात्र कोणतेही ठोस कारण न देता पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आला.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: कोपर्डी खटला : मुख्यमंत्र्यांना साक्षीदार करण्याची मागणी आरोपीच्या वकिलांकडून मागे Rating: 5 Reviewed By: DNA Live24