728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

नगर जिल्ह्यात लागोपाठ खुनांचे सत्र !


अहमदनगर । DNA Live24 - गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात लागोपाठ खुनांचे सत्र सुरू झाले आहे. पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी नगर जिल्ह्याचा पदभार स्वीकारताच काही दिवसांनंतरऔरंगाबाद रस्त्यावर खोसपुरी शिवारात एक अनोळखी मृतदेह आढळला होता.

त्यानंतर शेवगावात एकाच कुटुंबातील चौघांच्या हत्येमुळे खळबळ उडाली. तेव्हापासून ठराविक अंतराने जिल्ह्यात ठिकठिकाणी मृतदेह आढळत आहेत. यापैकी काही मृतदेहांची ओळख निष्पन्न होऊन आरोपींना अटकही झाली. मात्र, कर्जत तालुक्यातील दोन मृतदेह अनोळखी असल्यामुळे या गुन्ह्यांची उकल करण्याचे कडवे आव्हान पोलिसांसमोर आहे.

पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी जून महिन्यात नगरच्या जिल्हा पोलिस प्रमुखपदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर अाठवडाभरातच औरंगाबाद महामार्गावर खोसपुरी शिवारात एक अनोळखी मृतदेह आढळला. दुसऱ्याच दिवशी या मृतदेहाची ओळख पटली. मात्र खुनाचे कारण शोधून आरोपी अटक करण्यास पोलिसांना बराच अवधी लागला. १७ जूनला शेवगावातील विद्या कॉलनीमध्ये एकाच कुटुंबातील चौघांची गळे चिरून हत्या झाली. या हत्याकांडामुळे शेवगावसह जिल्हाभरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक गुन्हे शाखेने वेगाने या गुन्ह्याचा तपास करुन तिघा जणांना अटक केली.

शेवगावातील हरवणे कुटुंबियांचे हत्याकांड चोरी करायला आलेल्या दरोडेखोरांनी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तीन दरोडेखाेरांनी या कृत्याची कबुलीही दिली. मात्र, तेव्हापासून जिल्ह्यात खुनांचे सत्रच सुरू झाले. कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत चार दिवसांपूर्वी एका भिकाऱ्याचा मृतदेह आढळला होता. मात्र सुदैवाने चोवीस तासांच्या आत या मृतदेहाची ओळख पटून मारेकऱ्याला जेरबंद करण्यात पाेलिसांना यशही आले. दुसऱ्या भिकाऱ्यासोबत झोपण्याच्या जागेवरुन झालेल्या वादातून चाकूने भोसकून हा खून झाला होता. पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटकही केली.

एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत केकताई परिसरात एका आश्रमात साधू महाराजासह एका भाविकाला जाळून ठार मारण्यात आले. हा प्रकार गुरूवारी दुपारी उजेडात आला. या घटनेतील आरोपीचे नाव व ओळख निष्पन्न झाली असली तरी तो फरार असल्यामुळे अद्याप त्याला अटक झालेली नाही. कर्जत तालुक्यात गेल्या दोन आठवड्यात दोन वेळा अनोळखी मृतदेह आढळले आहेत. पहिल्या घटनेत एका महिलेचे व दोन मुलांचे मृतदेह आढळले होते. तर दुसऱ्या घटनेत एका पुरुषाचा मृतदेह आढळला होता. दुसऱ्या घटनेतील पुरुषाची ओळख पटली असून तो सांगलीचा असल्याचे निष्पन्न झाले.

नेवासे शहरात आपांपसातील खुनशीतून दोन गटांत वाद उफाळले. त्यात हाणामारी होऊन दोन युवकांना बेदम मारहाण झाली. हे दोघे जण खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना एका युवकाचे निधन झाले. त्यातून खुनाचा गुन्हा नोंदण्यात आला. मात्र, पोलिसांनी वेगाने तपास करुन मुख्य सूत्रधारासह इतर आरोपींना अटक केली. इतर मारेकऱ्यांचाही शोध सुरू आहे. 

या घटनेनंतरही नेवासा शहरातील वातावरण अद्याप तणावपूर्णच आहे. तेथे पुन्हा टोळीयुद्धाचा भडका उडू नये, यासाठी पोलिसांना विशेष दक्षता घ्यावी लागणार आहे. इतर ठिकाणच्या अनोळखी मृतदेहांची ओळख पटवण्याचे आव्हानही अद्याप कायम आहे.

त्यांचे गूढ कायम - तोफखाना हद्दीत तीन महिन्यांपूर्वी एका युवतीचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला होता. या मृतदेहाची ओळखही अद्याप पटलेली नाही. युवतीच्या मृतदेहाशेजारी एक पाण्याची बाटली आढळली होती. इतर कोणतेही पुरावे मिळाले नाहीत. पोलिसांनी या गुन्ह्याच्या तपासात थेट गुजरात गाठले. पण, त्यांना अद्यापही काहीच धागेदोरे गवसलेले नाहीत. कर्जत तालुक्यात आढळलेल्या महिला व मुलांची ओळखही अद्याप पटलेली नाही. त्यामुळे आधी या मृतदेहांची ओळख पटवावी लागणार आहे. त्यानंतर त्यांच्या खुनाचे कारण शोधून आरोपींच्या मुसक्या आवळाव्या लागतील.

म्हणून जाळतात - तत्कालिक वादातून, किरकोळ कारणावरुन किंवा नाजूक संबंधातून जिल्ह्यात खुनाचे प्रकार होत आहेत. मात्र, खून करुन मृतदेह जाळण्याचे प्रकार वाढले आहेत. मृतदेहाची ओळख पटू नये, मागे कोणताच पुरावा राहू नये, पोलिसांना आपला शोध घ्यायला अडचण व्हावी, या उद्देशानेच मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणूनच जिल्ह्यात आढळलेले बहुतांश मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडत आहेत. त्यामुळे पोलिसांपुढे अशा मृतदेहांचा सखोल तपास करुन ठोस पुरावे गोळा करण्याचे आव्हानही निर्माण होत आहे. पोलिसांनी तर अशा घटनांचा धसकाच घेतला आहे.

परराज्यात शोध - तोफखाना, कर्जत, श्रीगोंदा हद्दीत आढळलेल्या मृतदेहांची अद्यापही ओळख पटलेली नाही. जिल्ह्यात सर्व पोलिस ठाण्यांमध्ये संबंधित वर्णनाचे कोणी बेपत्ता आहे का, याची शहानिशा करुन झालेली आहे. त्यातूनही काही निष्पन्न झालेले नाही. त्यामुळे आता मृतदेहांच्या वर्णनाचे रेखाचित्र तयार करुन शेजारच्या जिल्ह्यांमध्ये ते प्रसिद्ध करण्याचे काम सुरू आहे. जेणेकरुन मृतदेह शेजारच्या जिल्ह्यातील असल्यास त्यांची ओळख पटवता येणार आहे. मृतदेहाची ओळख पटल्यानंतरच पुढील तपासाची दिशा मिळते. त्यामुळे आणखीही काही तांत्रिक मदत घेतली जात आहे.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: नगर जिल्ह्यात लागोपाठ खुनांचे सत्र ! Rating: 5 Reviewed By: DNA Live24