728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

सायबर पोलिस रोखणार ऑनलाईन फसवणूक !


अहमदनगर । DNA Live24 - नव्यानेच सुरू झालेल्या सायबर पोलिस ठाण्यासमोर नागरिकांची ऑनलाईन फसवणूक रोखण्याचे मोठे आव्हान आहे. सायबर पोलिसांकडे आतापर्यंत जिल्ह्याच्या विविध भागातून सुमारे शंभरहून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यातील बहुतांश तक्रारी फोनवरुन ओटीपी विचारुन ऑनलाईन पद्धतीने परस्पर पैसे काढून घेतल्याच्या आहेत. नागरिकांची ऑनलाईन फसवणूक टाळण्यासह त्यांची जनजागृती करण्याचे कामही सायबर पोलिसांना करावे लागेल.

कोणत्या तरी बँकेतून बोलतोय, असे सांगून फोनवरुन एटीएम कार्डचे डिटेल्स विचारुन, ग्राहकांच्या एटीएम कार्डचे गोपनीय ओटीपी नंबर विचारुन ऑनलाईन पद्धतीने परस्पर पैसे काढून घेण्याचे प्रकार नेहमी होतात. याबाबत पोलिसांनी अनेकदा जनजागृती व आवाहन करुनही नागरिक ऑनलाईन फसवणुकीला बळी पडत आहेत. नुकत्याच गुन्हे आढावा बैठकीत सायबर पोलिसांच्या वतीने काही सूचना देण्यात आल्या आहेत.

ऑनलाईन पद्धतीने पैसे काढून घेतल्यास तत्काळ पोलिसांकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. चोवीस तासांच्या आत तक्रार केल्यास संबंधित बँक ग्राहकाचा झालेला व्यवहार स्थगित करते. त्यामुळे गेलेले पैसे परत मिळण्याची शक्यता असते. मात्र, परस्पर पैसे काढल्यानंतर उशिराने तक्रार केली, तर मात्र गेलेले पैसे पुन्हा परत मिळण्याची शक्यता कमी असते. याविषयी पोलिसांनाही फारशी माहिती नव्हती. म्हणूनच गुन्हे आढावा बैठकीत याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये नोंदवलेल्या गुन्ह्यांची माहिती सायबर पोलिस ठाण्यात एकत्रित केली जात आहे. त्यामध्ये गुन्ह्यांपेक्षा तक्रार अर्जांची संख्या अधिक आहे. सुमारे शंभर अर्ज असून त्यापैकी ७० टक्के अर्ज ऑनलाईन फसवणुकीबद्दल आहेत. तर इतर सोशल मिडियावर बनावट खाते तयार करुन बदनामी केल्याचे आहेत. या सर्व तक्रार अर्जांचा निपटारा करण्याचे काम सध्या सायबर पोलिस ठाण्यामार्फत सुरू आहे.

बनावट अकाैंट - फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल नेटवर्किंग साईट्सवर मुलींच्या, महिलांच्या नावाने बनावट अकाैंट तयार करुन त्यांची बदनामी करण्याचे प्रकार होतात. अशा तक्रारीही सायबर पोलिसांकडे येत आहेत. अशा तक्रारींचा निपटारा प्राधान्याने करण्याचे काम सायबर पोलिस ठाण्यामार्फत केले जात आहे. बनावट अकाऊंट तयार करुन जातीय तेढ निर्माण करणारा मजकूर व्हायरल करण्याचे कामही हाणून पाडले आहे.
तत्काळ तक्रार करा - कोणालाही आपली वैयक्तिक माहिती, एटीएमचे डिटेल्स, ओटीपी नंबर देण्याचे टाळावे. ऑनलाईन फसवणुकीला बळी पडू नये. असा प्रकार घडलाच तर वेळ न घालवता तत्काळ सायबर व नजिकच्या पोलिस ठाण्यात संपर्क साधून तक्रार नोंदवावी. ऑनलाईन पद्धतीने काढलेले पैसे चोवीस तासांच्या आत परत मिळतात. नंतर ही प्रक्रिया जिकिरीची होते. - सुनिल पवार, पोलिस निरीक्षक, सायबर शाखा.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: सायबर पोलिस रोखणार ऑनलाईन फसवणूक ! Rating: 5 Reviewed By: DNA Live24