व्‍यसनमुक्‍त महाराष्‍ट्रासाठी ग्रामरक्षकदलाचे काम महत्‍वाचे


अहमदनगर । DNA Live24 - अवैध मद्यनिर्मिती व विक्रीवर लोकसहभागातून  प्रभावीपणे नियंत्रण मिळावे व त्‍यांचे समूळ उच्‍चाटन करण्‍यासाठी ग्रामरक्षकदलाची स्‍थापना करण्‍यात येणार आहे. व्‍यसनमुक्‍त महाराष्‍ट्रासाठीही  ग्रामरक्षक दलाचे काम महत्‍वपूर्ण ठरणार आहे, असे प्रतिपादन उर्जा, नवीन व नवीकरणीय उर्जा, राज्‍य उत्‍पादन शुल्‍कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. 

अहमदनगर जिल्‍ह्यात प्रायोगिक तत्‍वावर ग्रामरक्षक दलाची स्‍थापना करण्‍यात येणार असून येत्‍या सहा महिन्‍यात संपूर्ण राज्‍यात ग्रामरक्षक दलाची स्‍थापना करण्‍यात येणार असल्‍याचेही त्‍यांनी यावेळी सांगितले. नगर जिल्‍ह्यात ग्रामरक्षक दलाची स्‍थापना करण्‍याबाबत जिल्‍हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत उर्जामंत्री बावनकुळे बोलत होते. 

यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्‍हणून पद्मभूषण अण्‍णा हजारे, खासदार दिलीप गांधी, आमदार शिवाजी कर्डिले, विजय औटी, बाळासाहेब मुरकुटे, जिल्‍हाधिकारी अभय महाजन, निवासी उपजिल्‍हाधिकारी  गोपीचंद कदम, उत्‍पादन शुल्‍क विभागाचे अधीक्षक पराग नवलकर आदि उपस्थित होते.

राज्‍य उत्‍पादन शुल्‍कमंत्री  बावनकुळे म्‍हणाले, राज्‍यात मालवणी व पांगरमलसारख्‍या घटना घडू नयेत, विषारी दारुमुळे  कुटूंब उध्‍दवस्‍त होवू नये यासाठी मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस व  पद्मभूषण अण्‍णासाहेब हजारे यांच्‍या सूचनेनुसार हा कायदा तयार करण्‍यात आला आहे. अवैध मद्यनिर्मिती व विक्री विरुध्‍द लढणा-याला या कायद्याने संरक्षण दिले आहे.   

ग्रामरक्षक दलाच्‍या माध्‍यमातून नगर जिल्‍हयात पथदर्शी काम होईल. पुढील सहा महिन्‍यात राज्‍यातील प्रत्‍येक जिल्‍हयात ग्रामरक्षक दलाची स्‍थापना करण्‍यात येणार आहे. जिल्‍हयातील 1,311 ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्‍य व लोकप्रतिनिधी यांचा सहभाग घेत पंचायत समिती स्‍तरावर तातडीने बैठक घेवून महिनाभरात लोकसहभागातून ग्रामरक्षक दलाची स्‍थापना करण्‍याच्‍या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्‍या आहेत.

ग्रामरक्षक दलाच्‍या स्‍थापनेनंतर मुख्‍यमंत्री महोदयांच्‍या उपस्थितीत कार्यशाळा घेण्‍यात येणार असल्‍याचे राज्‍य उत्‍पादन शुल्‍कमंत्री  बावनकुळे यांनी यावेळी सांगितले. राज्‍यात व्‍यसनमुक्‍तीचा कार्यक्रम राबवून व्‍यसनमुक्‍त महाराष्‍ट्रासाठी स्‍वंयसेवी संस्‍थेच्‍या माध्‍यमातून जागती केली जाणार आहे, ग्रामरक्षक दलाबाबत माहिती देणारी पुस्तिका तयार करण्‍यात येणार असून ग्रामरक्षकदलाच्‍या स्‍थापनेनंतर लोकसहभाग वाढेल, असा विश्‍वासही बावनकुळे यांनी व्‍यक्‍त केला.

पद्मभूषण अण्‍णासाहेब हजारे म्‍हणाले, या कायद्याच्‍या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे. आपण स्‍वतः राज्‍यात या कायद्याचा प्रचार करणार असून ग्रामरक्षक दलाच्‍या माध्‍यमातून देशात पतदर्शी काम उभे करु, असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

जिल्‍हाधिकारी अभय महाजन यांनी जिल्‍हयातील ग्रामरक्षक दलाच्‍या स्‍थापनेसंदर्भात सविस्‍तर माहिती दिली. यावेळी लोकप्रतिनिधी, अधिकारी यांनी कायद्या संदर्भातील चर्चेत सहभाग घेतला. यावेळी जिल्‍हयातील लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.