Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

रविवार, ३० जुलै, २०१७

नगरसेवकांना आता १० हजारांचे मानधन


अहमदनगर । DNA Live24 - महापालिका नगरसेवकांच्या दरमहा मानधनात शासनाने घसघशीत वाढ केली आहे. अहमदनगर महापालिकेतील नगरसेवकांना आता मानधनापोटी १० हजार रुपये मिळणार आहेत. महापालिका आधीच आर्थिक अडचणीत असल्याने पूर्वीचेच मानधन तीन ते चार महिने दिले जात नव्हते. त्यामुळे आता या वाढीव मानधनाचा बोजा महापालिकेवर पडणार आहे.

याबाबत राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने शासन निर्णय काढला आहे. राज्यातील बृह्न्मुंबई महानगरपालिकेतील सदस्यांचे मानधन २००८ व इतर महानगरपालिकातील सदस्यांचे मानधन २०१० साली निश्चित केले होते. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सदस्यांचे मानधन वाढविण्याचे शासनाच्या विचाराधीन होते. त्यानुसार सदस्यांचे मानधन दूरध्वनी, लेखनसामुग्री व टपाल याचा खर्च लक्षात घेऊन नव्याने निश्चित केले आहे. 

त्यानुसार ‘अ+’ वर्ग असलेल्या महानगरपालिकातील नगरसेवकांना २५ हजार, ‘अ’ वर्गच्या नगरसेवकांना २० हजार, ‘ब’ वर्गसाठी १५ हजार तर ‘क’ व ‘ड’ वर्ग महानगरपालिकातील नगरसेवकांना १० हजार रुपये मानधन मिळणार आहे. नगर महानगरपालिकेचा समावेश ‘ड’ वर्गमध्ये होतो. एकीकडे मनपातील कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी मनपाकडे पैसे नसताना नगरसेवकांच्या मानधनवाढीचा मोठा आर्थिक फटका पालिकेला बसणार आहे. यापूर्वी नगर मनपाच्या नगरसेवकांना ७ हजार ५०० रुपये दरमहा मानधन दिले जात होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Top Ad

Your Ad Spot

Pages