Header Ads

 • Breaking News

  डॉक्टर कांडेकरांना ५० लाखांची खंडणी मागणारा जेरबंद


  अहमदनगर । DNA Live24 - मावशीच्या ऑपरेशनच्या वेळी बिलात सवलत न दिल्याचा राग आणि कर्ज फेडण्यासाठी सोप्या मार्गाने पैसे मिळतील, म्हणून एका युवकाने डॉक्टरलाच खंडणी मागितली. डॉ. बापूसाहेब कांडेकर यांना रुग्णालयातील फोनवरुन कुख्यात गुंड छोटा शकीलच्या नावाने ५० लाख रुपयांची खंडणी मागितली जात होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी खंडणी मागणाऱ्या युवकाच्या मुसक्या आवळल्या, अशी माहिती पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली. नितीन मधुकर भोस (वय २६, रा. निमोणे, ता. शिरुर, जि. पुणे) असे खंडणी मागणाऱ्या युवकाचे नाव आहे.

  नितीन भोस काही दिवसांपासून डॉ. कांडेकर यांच्या दवाखान्यात फोन करुन खंडणीची मागणी करायचा. कांडेकर यांनी आधी याकडे दुर्लक्ष केले. मात्र, ११ जुलैला नितीनने त्यांना छोटा शकीलचा माणूस असल्याचे सांगून ५० लाख रुपये दिले नाही, तर जीवे मारण्याची धमकीही दिली. त्यामुळे कांडेकर यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला. या गुन्ह्यात नितीनचे नाव निष्पन्न झाले होते. मात्र, तो राज्याबाहेर पळून गेला होता. सोमवारी तो वाळकीमध्ये येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

  पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील व सहायक पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकातील सहायक निरीक्षक संदीप पाटील, फौजदार राजकुमार हिंगोले, हेड कॉन्स्टेबल योगेश गोसावी, दत्ता हिंगडे, उमेश खेडकर, पोलिस नाईक भागिनाथ पंचमुख, संदिप पवार, रावसाहेब हुसळे, रविकुमार सोनटक्के, दिपक शिंदे, कॉन्स्टेबल योगेश सातपुते, विनोद मासाळकर, चालक संभाजी कोतकर, संदीप घोडके यांनी वाळकीत सापळा रचून नितीनला पकडले.

  शिरुर तालुक्यातील रांजणगाव येथे राहणारी नितीनची मावशी दीड वर्षांपूर्वी कांडेकर यांच्या रुग्णालयात अॅडमिट होती. त्यावेळी दोन लाख रुपयांचे बिल झाले होते. विनवण्या करुनही कांडेकर यांनी बिलात सवलत दिली नव्हती. त्यामुळे नितीनला त्यांचा राग होता. तसेच वीज पडलेली दुर्मिळ वस्तू खरेदी-विक्री करण्याचा नादही त्याला लागला होता. त्यामुळे त्याच्यावर ४ ते ५ लाख रुपयांचे कर्ज झाले होते. म्हणून त्याने थेट छाेटा शकीलच्या नावाखाली कांडेकर यांना खंडणी मागितली. त्यामुळे गजाआड होण्याची वेळ त्याच्यावर आली.

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  Post Top Ad

  Post Bottom Ad