728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

म्हणून त्यांनी रस्त्यावर धुतले कपडे, अन् पेटवली चूल !


अहमदनगर । DNA Live24 - घरकुल वंचितांसाठी तातडीने पंतप्रधान आवास योजनेची अंमलबजावणी करावी. सरकारी जागेवरील घरकुल वंचितांचे अतिक्रमण नियमाकुल करावे. मध्यप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात घरकुल हमी कायदा लागू करुन, लॅण्ड बँकच्या माध्यमातून भूमीगुंठा उपलब्ध करुन देण्याच्या मागणीसाठी मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने नगर- औरंगाबाद महामार्गावरील स्टेट बँक चौकात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. घरकुल वंचितांच्या वेदना सरकारच्या निदर्शनास आणून देण्यासाठी उघड्यावर संसार थाटण्यात आला.

आंदोलनात सहभागी महिलांनी रस्त्यावर चुल पेटवून, कपडे धुतले. गृहनिर्माण मंत्रालय आणि ग्रामीण विकास खाते घरकुल वंचितांना न्याय देवू शकत नसल्याने राज्यसरकारचा निषेध म्हणून संघटनेच्या वतीने महाराष्ट्र मंत्रालयाला मेंढरालय प्रतिकात्मक नाव देण्यात आले. राज्याच्या 51 शहरात प्रधानमंत्री आवास योजना लागू करण्यात आली. मात्र त्याच्या अंमलबजावणीसाठी एक आर जमीन सुध्दा शासनाकडून महापालिकेला देण्यात आलेली नाही.

लॅण्ड बँक स्थापन करुन सरकारी जागा घरकुल वंचितांना उपलब्ध करुन दिल्यास घरकुल वंचितांचा प्रश्‍न मिटेल. या योजनेला गती देण्यासाठी राज्यात घरकुल हमी कायदा लागू करण्याची गरज आहे. जमिनीचे भाव गगनाला भिडले असताना राज्य व केंद्र सरकार कडून दिले जाणाऱ्या अडीच लाखाच्या अनुदाना ऐवजी भूमीगुंठा उपलब्ध करुन देण्याची संघटनेची मागणी आहे. या प्रश्‍नावर संघटनेने 72 आंदोलने केली. मात्र शासन घरकुल वंचितांच्या प्रश्‍नाकडे गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप आंदाेलकांनी केला.

अशोक सब्बन म्हणाले, सरकार घरकुल वंचितांच्या संयमाचा अंत पाहत आहे. या सरकारच्या नाकर्तेपणाच्या निषेधार्थ महाराष्ट्र मंत्रालयाचे नामांतर मेंढरालय केल्याचे त्यांनी सांगितले. स्टेट बँक चौकात रास्तारोको नंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाने येवून घरकुल वंचितांनी निदर्शने केली. या आंदोलनात ओम कदम, अशोक सब्बन, वैशाली नागपुरे, कान्हु सुंबे, अंबिका नागुल, शारदा भालेकर, हिराबाई ग्यानप्पा, दिपाली आडेप, सुनिल कावट, कारभारी गायकवाड व घरकुल वंचित मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: म्हणून त्यांनी रस्त्यावर धुतले कपडे, अन् पेटवली चूल ! Rating: 5 Reviewed By: DNA Live24