केकताई हत्याकांड : आरोपीची माहिती देणाऱ्यास २५ हजारांचे बक्षीस

अहमदनगर । DNA Live24 - केकताई डोंगराच्या परिसरात झालेल्या दुहेरी हत्याकांडातील आरोपीच्या शोधासाठी एमआयडीसी पोलिसांनी बक्षीस जाहीर केले होते. आरोपीची माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवून १५ हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल, असे पोलिसांनी सांगितले होते. आता या बक्षीसाच्या रकमेत वाढ करण्यात आली असून ती २५ हजार करण्यात आली आहे. तसेच संशयित आरोपीचे सुधारित रेखाचित्रही पोलिसांनी जारी केले आहे. हा आरोपी खून केलेल्या साधूची घोडी घेऊन पसार झालेला आहे.

वडगाव गुप्ता परिसरातील केकताई डोंगराच्या परिसरात असलेल्या आश्रमात १३ जुलैला पहाटेच्या सुमारास एका साधू महाराजांसह त्यांच्या भक्ताचा जाळून खून करण्यात आला. सुदाम नामदेव बांगर उर्फ सूरजनाथ महाराज (रा. वडगाव गुप्ता) व यादव उर्फ बाबासाहेब बाबूराव कराळे (रा. शेंडी) अशी खून झालेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात खुनाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण हे करीत आहेत.

केकताई आश्रमाजवळच देवीचे मंदिर होते. काही दिवसांपूर्वी श्रीरामपूरहून एक युवक तेथे रहायला आला होता. तो स्वत:ला सूरजनाथ महाराज यांच्या सेवेकरी असल्याचे सांगत होता. गुरूवारी दुहेरी हत्याकांड झाल्यापासून तो फरार आहे. या युवकानेच हे हत्याकांड केल्याचा पोलिसांचा संशय आहे. याप्रकरणी पोलिसांनी २० हून अधिक जणांची चौकशी केली आहे. आरोपींची माहिती सहायक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्याशी मोबाईल क्रमांक ९० ११ ०९० ९७५ वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.