सायबर सेलमुळेच तो अपहणकर्ता गजाआड


अहमदनगर । DNA Live24 - सायबर सेलच्या तपासामुळे दोन महिन्यांपासून अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन फरार झालेला आरोपी सापडला आहे. अक्षय घोडके (रा. बाेल्हेगाव, नगर) असे आरोपीचे नाव आहे. सायबर सेलने या गुन्ह्याचा तपास करुन घोडकेचा माग शोधला. त्यानंतर तोफखाना पोलिसांनी त्याला पुण्यात जाऊन मुलीसह ताब्यात घेतले. घोडकेला पोलिसांनी अटक केली आहे. तर मुलीला एका स्वयंसेवी संस्थेच्या ताब्यात दिले आहे.

दोन महिन्यांपूर्वी बोल्हेगावातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन अक्षय घोडके पसार झाला होता. याप्रकरणी मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. तोफखाना पोलिसांनी अारोपीचा शोध घेण्याचा कसोशीने प्रयत्न केला. मात्र, तो सापडत नव्हता. सायबर सेलच्या फौजदार किर्ती पाटील, प्रतिक कोळी, पोलिस कॉन्स्टेबल राहुल गुंडू, अरुण सांगळे, आकाश भैरट, यांनी तांत्रिकदृष्ट्या तपास करुन घोडकेचा माग काढला.

सायबर सेलने दिलेल्या माहितीच्या आधारे तोफखाना पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक विशाल सणस, पोलिस कॉन्स्टेबल याकूब सय्यद, महिला पोलिस कॉन्स्टेबल गहिले यांच्या पथकाने पुण्यात जाऊन आरोपी घोडके याला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून मुलीचीही सुटका करण्यात आली. या गुन्ह्याचा अधिक तपास तोफखाना पोलिस करीत आहेत.