Header Ads

 • Breaking News

  शेतकरी कर्जमाफीसाठी अर्ज भरायला सुरुवात


  अहमदनगर । DNA Live24 - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी शेतकऱ्यांचे अर्ज भरून घेण्यास सुरुवात झाली आहे. जिल्हाभरात आपले सरकार सेवा केंद्रांमध्ये शेतकऱ्यांना मोफत अर्ज भरता येणार आहेत. अर्जाचे नमुने सर्व बँका, सोसायट्यांना पाठविण्यात आले आहे.

  शेतकरी कर्जमाफी योजनेची घोषणा झाल्यानंतर त्याबाबतचे निकष स्पष्ट नव्हते. शासन निर्णयात त्रुटी असल्याने तीन वेळेस बदल करावा लागला. आता लाभार्थी शेतकऱ्यांचे अर्ज भरून घेण्यात येणार आहेत. यासाठी अर्जाचे नमुने जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने २ हजार ५३५ नमुने छापले आहेत.

  शेतकऱ्यांना अर्ज भरण्यासाठी संबंधित सोसायट्यांमध्ये जावे लागेल. सोसायट्यांमधून शेतकऱ्यांना अर्जाच्या नमुन्यात असलेली थकबाकी व इतर माहिती लिहून देण्यात येईल. ही माहिती सही, शिक्क्यासह शेतकऱ्याला देण्यात येणार आहे. ती माहिती घेऊन आपले सरकार सेवा केंद्रात गेल्यानंतर शेतकऱ्याचा अर्ज ऑनलाईन भरण्यात येईल.

  ऑनलाईन अर्ज भरताना त्यात शासन निर्णयानुसार सर्व प्रकारची माहिती भरावी लागणार आहे. त्यामुळे खोटी माहिती भरली गेल्यास त्याला जबाबदार कोण? याबाबत मात्र अजून कुठलीही माहिती उपलब्ध झालेली नाही. काल शासनाने आदेश दिल्यानंतर ठिकठिकाणी हे अर्ज भरण्यास सुरुवात करण्यात आली. 

  अर्ज भरण्याचा पहिलाच दिवस असल्याने अनेक शेतकऱ्यांना याविषयी माहिती नव्हती. दिवसभरात ही वार्ता अनेकांपर्यंत पोहोचल्याने चौकशीसाठी बँका, सोसायट्यांमध्ये गर्दी झाली. अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांची आर्थिक लूट होण्याची शक्यता असून, त्यासंदर्भात प्रशासनाने ठोस आदेश देण्याची मागणी सुरु झाली आहे.

  Post Top Ad

  Post Bottom Ad