Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

रविवार, २ जुलै, २०१७

ज्येष्ठ अभिनेते, लेखक प्रा. मधुकर तोरडमल यांचे निधन


मुंबई । DNA Live24 - प्रसिद्ध नाटककार, दिग्दर्शक, प्राध्यापक, लेखक, अनुवादक, नाटय़निर्माता अशा विविधांगी भूमिका पार पाडणारे बहुआयामी आणि चतुरस्र व्यक्तिमत्त्व ज्येष्ठ अभिनेते मधुकर तोरडमल अर्थात नाटयसृष्टीचे ‘मामा’ यांचे रविवारी सायंकाळी निधन झाले. त्यांचे पार्थिव उद्या सकाळी ९ वाजता ज्ञानदेवी, साहित्य सहवास, बांद्रा-पूर्व येथे आणि त्यानंतर १० -११ यशवंत नाट्य मंदिर येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. मधुकर तोरडमल यांच्या निधनाने मराठी रंगभूमी चित्रपटसृष्टी समृद्ध करणारे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व मावले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मामांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. अभिनय, लेखन आणि अनुवाद अशा तिन्ही प्रांतात तोरडमल यांनी दिलेले योगदान वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यांना मराठी रंगभूमी आणि साहित्य समृद्ध करण्याचा ध्यास होता. 'तरूण तुर्क म्हातारे अर्क' या स्वतः लिहिलेल्या नाटकातील त्यांची प्रा. बारटक्के ही भूमिका कायम स्मरणात राहिल. नाट्यलेखनाबरोबरच त्यांनी कादंबरी, चरित्र आणि अनुवाद असे साहित्यप्रकार त्यांनी ताकदीने हाताळले. 'आत्मविश्वास', 'आपली माणसे', 'बाळा गाऊ कशी अंगाई', 'सिंहासन' आदी चित्रपटातील त्यांच्या भूमिका विशेष स्मरणीय ठरल्या.

रसिकांच्या मनात आजही ‘प्रा. बारटक्के’ - तोरमडल यांनी रंगभूमीवर अनेक नाटकांतून विविध भूमिका केल्या. रसिकांच्या मनात आजही ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ या नाटकात त्यांनी रंगविलेला इरसाल ‘प्रा. बारटक्के’ घर करून आहे. नाटकाचे लेखन, दिग्दर्शन तोरडमल यांचेच होते. त्यांच्या स्वत:च्याच ‘रसिकरंजन’ नाटय़सस्थेतर्फे त्यांनी हे नाटक रंगभूमीवर आणले होते. ‘रसिकरंजन’तर्फे त्यांनी या नाटकाचे एक हजारांहून अधिक प्रयोग केले. त्यानंतर अन्य नाटय़संस्थांतर्फेही हे नाटक रंगभूमीवर सादर झाले. दोन वर्षांपूर्वी या नाटकाचा संयुक्त ५ हजारांवा प्रयोग दस्तुरखुद्द तोरडमल यांच्या उपस्थितीत साजरा केला.

‘अहमदनगर येथील ‘अहमदनगर महाविद्यालया’त दहा वर्षे इंग्रजीचा प्राध्यापक म्हणून नोकरी करणा-या तोरडमल यांनी ‘भोवरा’, ‘काळं बेट लाल बत्ती’ आदी नाटके लिहिली. गंभीर स्वरूपाची नाटकल होती. त्यामुळे माझा मित्र व रंगकर्मी दामू केंकरे याने एखादे विनोदी नाटक आता लिही म्हणून सुचविले होते. त्याची सूचना मनावर घेतली आणि हे नाटक लिहिले.

शिक्षण - तोरमडल यांच्या अभिनयाची सुरुवात ही मुंबईतून शाळेपासून झाली. ते १० वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांचे काका मुंबईत सांताक्रूझ पोलीस ठाण्यात होते. काकांनी त्यांना पुढील शिक्षणासाठी मुंबईत आणले. ‘शेठ आनंदीलाल पोद्दार’ ही त्यांची शाळा. शाळेत पहिल्या दिवशी ओळख करून देताना त्यांनी नाटकात काम करण्याचा छंद असल्याचे वर्गशिक्षिका जयकर बाईंना सांगितले. बाईंनी ते लक्षात ठेवून गणेशोत्सवात एका नाटकाची संपूर्ण जबाबदारी मामांवरच सोपविली. चिं. वि. जोशी लिखित ‘प्रतिज्ञापूर्ती’ हे नाटक त्यांनी बसविले. दिग्दर्शन व अभिनयही त्यांनी केला.

पुढे शाळेचे स्नेहसंमेलन व अन्य कार्यक्रमातून नाटक बसविण्याची जबाबदारी ओघानेच तोरडमलांकडे आली आणि त्यांनी ती यशस्वीपणे पारही पाडली. शालेय, महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी कुर्ला येथे ‘प्रीमियर ऑटोमोबाइल’ कंपनीत काही काळ ‘लिपिक’ म्हणून व पुढे नगरला महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काही काळ नोकरी केली. या काळात ‘भोवरा’, ‘सैनिक नावाचा माणूस’ आदी नाटके त्यांनी केली.

‘बळीमामा’ मुळे ‘मामा’ - राज्य नाटय़ स्पर्धेतही ते सहभागी झाले. त्यांनी ‘एक होता म्हातारा’ हे नाटक केले होते. या नाटकात त्यांनी साकारलेल्या ‘बळीमामा’ या भूमिकेमुळे त्यांना ‘मामा’ ही बिरुदावली मिळाली. पुढे सगळेजण त्यांना ‘मामा’ म्हणू लागले. राज्य नाटय़ स्पर्धेतून नाव झाल्यामुळे व्यावसायिक रंगभूमीकडून त्यांना विचारणा होऊ लागली. प्राध्यापकाची नोकरी करत असल्याने नोकरी सांभाळून ते नाटक करत होते.

अभिनय प्रवास - तोरडमल यांनी ‘नाटय़संपदा’, ‘नाटय़मंदार’, ‘धि गोवा हिंदू असोसिएशन’ आणि प्रामुख्याने ‘चंद्रलेखा’च्या नाटय़संस्थेतर्फे सादर झालेल्या नाटकातून कामे केली. ‘गुड बाय डॉक्टर’, ‘गोष्ट जन्मांतरीची’, ‘चांदणे शिंपित जाशी’, ‘बेईमान’, अखेरचा सवाल’, ‘घरात फुलला पारिजात’, ‘चाफा बोलेना’, ‘म्हातारे अर्क बाईत गर्क’ आदी अनेक नाटके केली. ‘संगीत मत्स्यगंधा’ या नाटकात त्यांनी साकारलेला ‘भीष्म’ही गाजला. कमलाकर तोरणे दिग्दर्शित ‘ज्योतिबाचा नवस’ हा त्यांचा पहिला चित्रपट. त्यानंतर ‘सिंहासन’, ‘बाळा गाऊ कशी अंगाई’, ‘आपली माणसं’, ‘आत्मविश्वास’, ‘शाब्बास सूनबाई’ हे मराठी चित्रपटही त्यांनी केले.

लेखक तोरडमल - तोरडमल यांनी ‘अ‍ॅगाथा ख्रिस्ती’च्या २७ इंग्रजी कादंबऱ्यांचा मराठीत अनुवाद केला आहे. तसेच र. धों. कर्वे यांनी लिहिलेल्या ‘बुद्धिप्रामाण्यवाद’ या इंग्रजी लेखसंग्रहाचे मराठी भाषांतर केले आहे. त्याशिवाय ‘आयुष्य पेलताना’ (रूपांतरीत कादंबरी), एक सम्राज्ञी एक सम्राट’ (चरित्रात्मक) तसेच ‘भोवरा’, ‘काळं बेट लाल बत्ती’, ‘गुड बाय डॉक्टर’, संघर्ष’, ‘सैनिक नावाचा माणूस’, ‘लव्ह बर्ड्स’, ‘म्हातारे अर्क बाईत गर्क’, ‘मृगतृष्णा’, ‘बाप बिलंदर बेटा कलंदर’ या नाटकांचे लेखनही केले. ‘तिसरी घंटा’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रकाशित झाले . यात जे काही सांगायचे राहिले ते पुढे ‘उत्तरमामायण’ या पुस्तकाद्वारे त्यांनी लिहिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Top Ad

Your Ad Spot

Pages