728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

'लिपस्टिक अंडर माय बुरखा'वर बंदी घालण्याची मागणी


अहमदनगर । DNA Live24 - लिपस्टिक अंडर माय बुरखा या सिनेमाने मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखवून, बुरखा घालणार्‍या महिलांप्रती पाहण्याचा दृष्टीकोन बिघडणार असल्याच्या निषेधार्थ अहमदनगर मुस्लिम एकता मंचच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करण्यात आली. तसेच या सिनेमावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली. 

यावेळी सिनेमाचे पोस्टर जाळण्यात आले. आंदोलनात इर्शाद सय्यद, मतीन सय्यद, अथर खान, अन्सार सय्यद, समीर शेख, सय्यद शाह फैसल, वसिम शेख, नासीर शेख, अस्लम शेख, नईम शेख, फिरोज कुरेशी, समीर बागवान, अन्सार सय्यद आदिंसह युवक सहभागी झाले होते. 

प्रकाश झा दिग्दर्शक असलेल्या लिपस्टिक अंडर माय बुरखा हा सिनेमा लवकरच सिनेमागृहात प्रदर्शित होणार असून, यामध्ये अभिनेत्री बुरखा घालून अश्‍लील चाळे करताना दाखविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. बहुतांश मुस्लिम महिला बुरखा घालत असतात. हा सिनेमा बुरख्यावर आधारीत असून, यामध्ये आक्षेपार्ह चित्रीकरण झाले आहे. हा सिनेमा प्रदर्शित होताना सेन्सॉर बोर्डाने कोणत्याही प्रकारे आक्षेप घेतला नसून, यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या जाणार आहे.

बुरख्यामध्ये वावरणार्‍या मुस्लिम समाजातील महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन देखील बदलणार आहे. अशा सिनेमामुळे अजून छेडछाडीला प्रोत्साहन मिळणार आहे. बुरख्याला टार्गेट करुन हा सिनेमा बनविण्यात आला असून, सिनेमा पुर्णत: अश्‍लील असल्याने समाजमनावर वाईट परिणाम होणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. 

सिनेमाच्या नांवातून बुरखा शब्द हटवावा. बुरखा घालून अभिनेंत्रीनी दिलेले अश्‍लील दृश्य चित्रपटातून वगळावे. प्रकाश झा यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याबद्दल गुन्हा दाखल करावा. चित्रपट पुर्णत: अश्‍लील व मुस्लिम समाजाच्या भावना दुखावणारा असल्याने त्याच्यावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: 'लिपस्टिक अंडर माय बुरखा'वर बंदी घालण्याची मागणी Rating: 5 Reviewed By: DNA Live24