Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

शनिवार, २२ जुलै, २०१७

संतापाचा अंत पाहू नका, अन्यथा रस्ता खोदून कायमचा बंद करु !


अहमदनगर । DNA Live24 - शहराबाहेरुन जाणाऱ्या बाह्यवळण (राज्य महामार्ग रस्ता क्र. 222) रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याच्या मागणीसाठी निंबळक गटातील ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागात ठिय्या मांडून अधिकाऱ्यांना घेराव घातला. कार्यकारी अभियंता भोसले रजेवर असल्याने उप कार्यकारी अभियंता एम. एच. कसबे यांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले. आठ दिवसांत रस्ता दुरूस्त करा.. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, अन्यथा बाह्यवळण रस्ता खोदून वाहतुकीसाठी कायमचा बंद करु, असा खणखणीत इशाराच ग्रामस्थांनी यावेळी दिला. 

कसबे यांनी आठ दिवसात निविदा प्रक्रिया पुर्ण करुन रस्ता दुरुस्तीचे काम सुरु करण्याचे लेखी आश्‍वासन दिले. एका महिन्यानंतर कामाला सुरुवात न झाल्यास रस्ता मध्यभागी खोदून वाहतुकीसाठी बंद करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. यावेळी माजी सरपंच विलास लामखडे, मारुती गारुडकर, अजय लामखडे, जगन्नाथ शिंदे, सुभाष कोरडे, संजय गायकवाड, मुख्तार शेख, बाबा पगारे, राजू रोकडे, तौफिक पटेल, सिकंदर तांबोली, बाबा मेढे, महादेव बडे, अशोक शिंदे, समीर पटेल, किसन शिंदे, उमेश साठे आदिंसह निंबळक गटातील ग्रामस्थ उपस्थित होते.

बाह्यवळण रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा प्राप्त झाल्याने दुरुस्तीचे काम रखडले आहे. ऐन पावसाळ्यात रस्त्याची मोठी दुरावस्था होवून, हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. बाह्यवळण रस्त्याचे हस्तांतरण राष्ट्रीय महामार्गासाठी झाल्यानंतर सिमेंटचा चार पदरी रस्ता होणार असल्याने, दुरुस्तीसाठी पैसे वाया न घालवायची भुमिका घेवून, सार्वजनिक बांधकाम विभागाने आपली जबाबदारी झटकली आहे. यासाठी निंबळक गटातील ग्रामस्थांनी दोन वेळा रास्ता रोको व ठिय्या आंदोलन केले.

बाह्यवळण रस्त्याची दुरावस्था झाल्याने, जागोजागी डांबर उखडून, मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. रात्रीच्या वेळी अनेक अपघात होवून अनेकांचे प्राण जात आहे. या रस्त्यावर वाहन चालकांना लुटण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. संपुर्ण रस्ता धुळीने माखला असताना रस्त्यालगत असलेल्या शेतीच्या पीकांचे धुळीने नुकसान झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणने आहे. या रस्त्याचे काम करण्यासाठी शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाला मंजुरी दिली आहे.
१७ कोटी गेले कोठे ? - तसेच बाह्यवळण रस्त्याच्या कामासाठी तब्बल १७ कोटी रुपये मंजुर झालेले आहेत. असे असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग कुठल्याही प्रकारे दखल घेत नसल्याचा आरोप करण्यात आला. तसेच तातडीने या रस्ता दुरुस्तीची मागणी ग्रामस्थांनी केली. तसेच या रस्त्यासाठी महाराष्ट्र शासनाने संपादित केलेल्या जमिनीचा थकित वाढीव मोबदला मिळण्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Top Ad

Your Ad Spot

Pages